Walmik Karad: वाल्मीक कराडला सुप्रीम दणका; तुरुंगातील मुक्काम वाढला, सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज फेटाळला

Walmik Karad bail application rejected: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड याला सुप्रीम दणका बसला. त्याने जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. काय आहे अपडेट?

Walmik Karad: वाल्मीक कराडला सुप्रीम दणका; तुरुंगातील मुक्काम वाढला, सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज फेटाळला
वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला
Image Credit source: गुगल
| Updated on: Feb 26, 2026 | 12:39 PM

Walmik Karad bail application rejected: संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड हा बीड कारागृहात असून त्याने हायकोर्टात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने देखील त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे, अशी माहिती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली आहे.

वाल्मीकचा तुरुंगातील मुक्काम वाढला

संतोष देशमुख यांचा अत्यंत निर्घृण खून करण्यात आला होता. खंडणी प्रकरणातून त्यांची हत्या झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता. या प्रकरणाने राज्यात मोठी खळबळ उडाली होती. सुरुवातीला पोलिसांची भूमिका अत्यंत संशयाची होती. याप्रकरणात मोर्चे आणि आंदोलन झाल्यानंतर गुन्हे दाखल करण्यास पोलिसांनी सुरुवात केली. तरीही मोठे मासे दूरच होते. दबाव वाढल्यानंतर याप्रकरणात आरोपींना अटक झाली होती. या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड असल्याचे चौकशीदरम्यान समोर आलं होतं. वाल्मीक कराड आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली. सर्वांवर मोक्का लावण्यात आला आहे. याप्रकरणात आपण दोषी नसल्याचा दावा वाल्मीक कराड आणि इतर आरोपींनी केला होता. पण सरकारी पक्षाने त्याचा हा दावा फेटाळला होता.

सुप्रीम कोर्टात जामीनासाठी धाव

वाल्मीक कराडने यापूर्वी जिल्हा न्यायालय आणि पुढे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीनासाठी धाव घेतली होती. मात्र गुन्ह्याचे गांभीर्य पाहता आणि पुराव्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. या निर्णयाला वाल्मीक कराडने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्याने जामीनासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. पण त्याला देशाच्या सर्वोच्च न्यायालयात झटका बसला. सुप्रीम कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे वाल्मीकला मोठा झटका बसला. त्याचा तुरूंगातील मुक्काम वाढला आहे.

कृष्णा आंधळे जिवंत, तीनदा गावात

तर या प्रकरणात घटनेपासून फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे हा जिवंत असून तो त्याच्या गावी तीनदा येऊन गेल्याचा दावा करण्यात येत आहे. याविषयीची माहिती पोलिसांना दिल्याची माहिती संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी दिली. कृष्णा आंधळे हा तीनदा गावात येऊन गेल्याचा दावा त्यांनी केला. तो मोबाईल वापरत नसल्याने त्याचे लोकेशन काढणे कठीण जात असल्याचे म्हटले जाते. पण मग पोलिसांचे खबऱ्यांचे नेटवर्क कामी येत नसल्याचा आरोपही होत आहे.