आहे तरी कोण हा खोक्या? उठसूट हाणतो, देतो धमक्या, पैशांच्या उधळतो गड्ड्या, सतीश भोसलेचा भूगोल-इतिहास काय?

Who is Khokya Alias Satish Bhosle : बीड जिल्हा गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. राज्यातच नाही तर देशात जिल्हा या ना त्या कारणाने गाजत आहे. वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगनंतर आता खोक्याची प्रकरणं समोर येत आहेत. कोण आहे हा सतीश भोसले?

आहे तरी कोण हा खोक्या? उठसूट हाणतो, देतो धमक्या, पैशांच्या उधळतो गड्ड्या, सतीश भोसलेचा भूगोल-इतिहास काय?
सुरेश धस यांचा निकटवर्तीय खोक्या आहे तरी कोण?
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
Updated on: Mar 12, 2025 | 12:23 PM

बीड जिल्हा गेल्या तीन महिन्यांपासून सतत चर्चेत आहे. जिल्ह्यातील राजकीय गुन्हेगारी हा देशात चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक बड्या नेत्यांचे कार्यकर्ते हे दहशत माजवताना दिसत आहे. त्यात वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगने तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या केल्याचे समोर आले. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. पण बीड जिल्ह्यातील राजकीय गुन्हेगारी कमी होण्याचे चित्र दिसत नाही. प्रत्येक तालुक्यातून एक तरी व्हिडिओ समोर येत आहे. वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगनंतर आता खोक्याची प्रकरणं समोर येत आहेत. कोण आहे हा सतीश भोसले?

सतीश भोसले याला प्रयागराज येथून अटक

सतीश भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय आहे. मारहाण करतानाचे, धमकी देतानाचे त्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याच्यावर कारवाईचा फास आवळला गेला. तो अनेक दिवसांपासून फरार होता. आता हाती आलेल्या बातमीनुसार पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक केली आहे. त्याला लवकरच कोर्टासमोर हजर करण्यात येईल.

कोण आहे खोक्या?

सतीश भोसले हा शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडी येथील रहिवाशी आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो राजकारणात सक्रिय असल्याचे समोर येत आहे. तो भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचा प्रमुख आहे. सामाजिक कार्यकर्ते आण पारधी समाजासाठी काम केल्यानंतर सतीश भोसले याची ओळख निर्माण झाली. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याने त्याची या परिसरात दहशत आहे. त्याने हरिणांची आणि वन्य प्राण्यांची शिकार केल्याचा आरोप करण्यात येतो. त्याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी मांस सापडल्याची माहिती समोर येत आहे.

उठसूट मारहाण, नोटांच्या बंडलाचा प्रताप

सतीश भोसले यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील व्यक्तीला बेदम मारहाण असो वा शिरूर तालुत्यातील बापलेकांना मारहाण असो खोक्याची दहशत दिसून येते. भोसलेचे 12 व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. तर दुसरीकडे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये त्याची उठबस, हेलिकॉप्टरमधून त्याची बादशाही एंट्री, पैशांच्या गड्ड्या मोजतानाचा व्हिडिओ, गळ्यात सोन्याच्या साखळ्या, हातातील बोटांमधील सोन्याच्या अंगठ्या यामुळे त्याच्याकडे इतका पैसा आला तरी कोठून असा सवाल अनेकांना पडला आहे.