‘या’ लोकांना लस मिळणार नाही; राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य

| Updated on: Jan 13, 2021 | 1:29 PM

कोरोनाची लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे. मात्र, लस घेतल्यानंतर काहीजणांना किरकोळ त्रास जाणवू शकतो. | Rajesh Tope

या लोकांना लस मिळणार नाही; राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
Follow us on

मुंबई: कोरोनाची लस (corona vaccine) ही सरसकट सर्व लोकांना देता येणार नाही. यामधून काही लोकांना वगळण्यात आल्याचे वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केले आहे. 18 वर्षांखालील लहान मुले, गरोदर किंवा स्तनदा माता आणि कोणत्याही प्रकारची एलर्जी असणाऱ्या लोकांना कोरोनाची लस देता येणार नाही, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. (Maharashtra health minister Rajesh Tope on Corona vaccination)

पुण्याच्या सीरम इन्सिट्यूटमधून निघालेला कोरोना लसींचा साठा राज्यातील आठ प्रमुख डेपोंमध्ये बुधवारी संध्याकाळपर्यंत दाखल होणार आहे. 15 तारखेच्या रात्रीपर्यंत या लसी ग्रामीण, जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दाखल होतील. त्यानंतर 16 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला.

‘लसीकरणासाठी पुढाकार घ्या, अशिक्षित लोकांपर्यंत सकारात्मक संदेश पोहोचवा’

कोरोनाची लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी लस घेण्यास नकार देऊ नये. तुम्ही लस घेऊन अशिक्षित लोक आणि ग्रामीण भागापर्यंत सकारात्मक संदेश पोहोचवला पाहिजे, असे आवाहन राजेश टोपे यांनी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना केले.
राज्यात कोरोनाच्या लसीकरणाचा कार्यक्रमक तीन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन आणि तिसऱ्या टप्प्यात व्याधी असणाऱ्या (को-मॉर्बिडिटी) असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाची लस दिली जाईल.

महाराष्ट्राला 9 लाख 63 हजार लसींचा साठा

महाराष्ट्रातील 55 टक्के लोकांना पुरेल इतका लसींच्या साठ्याची मागणी आम्ही केली होती. मात्र, केंद्र सरकारकडून सध्या महाराष्ट्राला केवळ 9 लाख 63 हजार लसी देण्यात आल्या आहेत. यामध्ये भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन लसीच्या 20 हजार कुप्यांचा समावेश असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. प्रत्येक व्यक्तीला लसीचे दोन डोस दिले जातील. यामध्ये 30 ते 45 दिवसांचे अंतर असेल.

कोरोनाच्या लसीमुळे कोणते साईड इफेक्टस होऊ शकतात?

कोरोनाची लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे. मात्र, लस घेतल्यानंतर काहीजणांना किरकोळ त्रास जाणवू शकतो. यामध्ये लस दिलेल्या भागात सूज येणे, अंगावर लाल पुरळ उठणे किंवा अस्वस्थ वाटणे अशा लक्षणांचा समावेश आहे. तर काहीजणांना ताप येणे किंवा चक्कर येण्यासारखी सामान्य लक्षणे जाणवू शकतात. शरीराला खाज येणे किंवा घाम सुटणे ही लक्षणे सामान्य नसली तरी त्यामुळे जीवघेणा धोका उद्भवणार नाही, अशी हमी राजेश टोपे यांनी दिली.

संबंधित बातम्या:

जगभरात भारतीय कोरोना लसी सर्वाधिक स्वस्त, अफवांवर विश्वास ठेवू नका, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं आवाहन

कोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल, परेलमध्ये साठवणूक, एका दिवसात किती जणांना लस?

(Maharashtra health minister Rajesh Tope on Corona vaccination)