
राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुका पार पडल्या आहे. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका बड्या नेत्याने उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. या नेत्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे संभाजीनगरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. याचा फटका पक्षाला आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. हा नेता कोण आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांनी शिवबंधन सोडत उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. पराभवाची नैतिक जबाबदारी घेत राजेंद्र राठोड यांनी राजीनामा दिला आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. राजेंद्र राठोड यांच्या कन्या यांना शिंदे यांच्या शिवसेनेकडून अब्दुल सत्तार यांनी जिल्हा परिषदेला उमेदवारी दिली असल्याचीही माहिती समोर आली आहे. मोनाली राठोड आमखेडा जिल्हा परिषद गटातून शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे आता राजेंद्र राठोड हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंना एका आठवड्याच्या आत दुसरा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे नेते दत्ता गोर्डे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दत्ता गोर्डे हे शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख होते. दत्ता गोर्डे यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना परभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये दत्ता गोर्डे यांच्या पत्नी यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचाही परभाव झाला, त्यानंतर दत्ता गोर्डे यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे.