मोठी बातमी! काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; बड्या नेत्यानं सोडली साथ, 22 तारखेला भाजपात प्रवेश

विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत, आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे, बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

मोठी बातमी! काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; बड्या नेत्यानं सोडली साथ, 22 तारखेला भाजपात प्रवेश
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 20, 2025 | 3:07 PM

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. महायुतीला तीन प्रमुख पक्ष भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट मिळून राज्यात तब्बल 232 जागा मिळाल्या, दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावलं लागलं. विधानसभा निवडणुकीनंतर आता महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. महाविकास आघाडीचे दिग्गज नेते महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. मात्र आता काँग्रेसमधील नेते देखील महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.

संग्राम थोपटे हे येत्या 22 तारखेला मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. संग्राम थोपटे यांनी आज कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली, या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. कार्यकर्त्यांचं म्हणण आहे की तुम्ही गेले अनेक वर्ष काँग्रेसचं काम करत आहात, आणि हे काम करत असताना सातत्यानं तुम्हाला पक्षाच्या माध्यमातून डावलण्यात आलं. शेवटी जनतेनं तुम्हाला मतदारसंघात तीन वेळा संधी दिली. तुम्ही जरी मतदारसंघात विकास काम केली असली तरी सुद्धा अजूनही विकासाला गती द्यायची असेल तर आपल्याला दुसऱ्या पक्षात जावं लागेल, त्या पद्धतीचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे, असं यावेळी संग्राम थोपटे यांनी म्हटलं आहे.

येत्या 22 एप्रिलला माझा पक्षप्रवेश होईल, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण उपस्थित असतील, मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह हा पक्षप्रवेश होईल असंही यावेळी संग्राम थोपटे यांनी म्हटलं आहे. दरम्यान येत्या काळात महापालिका निवडणुका होणार आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.