
राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र या निवडणुका स्वबळावर होणार की युती आणि आघाडीमध्ये होणार याचं चित्र अद्याप स्पष्ट नाही, त्यामुळे निवडणूक लढू इच्छित असणाऱ्या प्रत्येक पक्षातील भावी उमेदवारांचं टेन्शन वाढलं आहे, त्यातच ऐन निवडणुकीपूर्वी पक्षांतराला देखील वेग आला आहे, महापालिका निवडणुकांपूर्वी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणारे नेते आणि कार्यकर्ते सुरू असलेलं पक्षांतरण हे जवळपास सर्वच पक्षांसाठी आता डोकेदुखीचा विषय ठरत आहे.
दरम्यान राज्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यापूर्वीच पक्षाला धक्का बसला आहे. युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांच्या आई आणि काकांनी भाजपात प्रवेश केला आहे. 2 नोव्हेंबर रोजी शरद पवार हे अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर आहेत, त्यापूर्वीच शरद पवार गटाला हा धक्का बसला आहे. शरद पवार गटाचे युवक जिलाध्यक्ष अमित भांगरे आणि आई सुनीता भांगरे यांच्या गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं मंत्री विखे पाटील यांच्याशी भेटीगाठी सुरू होत्या.
त्यानंतर आज अखेर अमित भांगरे यांच्या आई आणि काका यांनी मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे अमित भागंरे यांची भूमिका मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. अमित भागंरे हे काल मुंबईत पार पडलेल्या पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित होते, मात्र आज अमित भागंरे यांच्या आई आणि काका यांनी भाजपात प्रवेश केल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव झाल्याने सुनीता भांगरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या तोडांवर हा राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये प्रवेश सुरू असतानाच अनेक जण आपल्याच मित्र पक्षात देखील प्रवेश करत असल्याचं पहायला मिळत आहे.