
राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने महाराष्ट्रात हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं आहे. ओबीसी आणि मराठा समाज आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. याची सर्वाधिक तीव्रता ही मराठवाड्यात दिसून येत आहे. नुकतीच बीडमध्ये ओबीसी नेत्यांची महाएल्गार सभा पार पडली, त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचं पहायला मिळत आहे, या सर्व घडामोडी सुरू असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे मराठवाड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री पकंजा मुंडे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. जय भगवान महासंघाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर मराठवाड्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत, अशातच जय भगवान महासंघ आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उतरणार आहे. मराठवाड्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्वच ठिकाणी जय भगवान महासंघ उमेदवार देणार आहे. जो कोणी ओबीसींचा विचार करेल असेच नेते आमच्या सोबत राहतील असं म्हणत बाळासाहेब सानप यांनी आता थेट धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना आव्हानच दिले आहे.
या निवडणुकीत मराठा समाज बांधवांना देखील सोबत घेणार असल्याची माहिती बाळासाहेब सानप यांनी दिली आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून कुठेतरी जातीवाद संपला पाहिजे, असेही बाळासाहेब सानप यांनी म्हटले आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता मराठवाड्यातील किती जागांवर जय भगवान महासंघ आपले उमेदवार उभे करेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. तर दुसरीकडे जय भगवान महासंघ निवडणूक रिंगणात उतरत असल्यामुळे मराठवाड्यातील ओबीसी नेत्यांना आता हे एक प्रकारे आव्हानच मानलं जात आहे. वंजारी समाजाला एसटी प्रवर्गात समावेश करावा ही मागणी आम्ही निवडणुकीच्या काळात देखील लावून धरणार आहोत, आणि त्याच माध्यमातून आता येणारी निवडणूक आम्ही लढणार आहोत, असं सानप यांनी म्हटलं आहे.