
महापालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराला देखील वेग आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर दोन दिवसांपूर्वी बुधवारी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीची अधिकृत घोषणा केली, तब्बल 18 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे सध्या दोन्ही पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, मात्र दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के सुरूच आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबईत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे विनायक राऊत यांचे निकटवर्तीय आणि शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी राजू नाईक व दिनेश कुबल यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. त्यांनी ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. दिनेश कुबल हे कलीना वॉर्ड क्रमांक 89 चे स्टॅंडिंग नगरसेवक असून त्यांनी आपल्या शकडो कार्यकर्त्यांसह गुरुवारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. सोबतच रवींद्र घोसाळकर, राजू शेट्टी, विशाल कनावजे या राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील कार्यकर्त्यांनी देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश म्हणजे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.
दरम्यान दुसरीकडे आज पुण्यात देखील मोठा पक्षप्रवेश होणार आहे, पुण्याचे शिवसेना ठाकरे गटाचे पुणे शहर उपप्रमुख सुरज लोखंडे हे आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत, आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह सुरज लोखंडे यांचा पक्षप्रवेश होणार आहे, युती झाल्यानंतर दोन दिवसांमध्ये शिवसेना ठाकरे गटाला दोन मोठे धक्के बसले आहेत. तर मनसेला देखील मोठा धक्का बसला आहे, ज्या दिवळी युतीची घोषणा झाली, त्याच दिवशी मनसेचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.