
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे एका गृहनिर्माण घोटाळा प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयानं मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांना मोठा दणका दिला आहे, त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत सापडले आहेत, दरम्यान शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणून कोकाटे यांनी उच्च न्यायालयात देखील धाव घेतली होती, मात्र त्यांना हाय कोर्टाकडून सध्या तरी कोणताही दिलासा मिळालेला नाहीये, हाय कोर्टानं या प्रकरणावर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला आहे. या प्रकणावर आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
नाशिक पोलिसांना माणिकराव कोकाटे यांच्या अटक वॉरंटची प्रत प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता कायदेशील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत. अटक वारंट जारी झाल्यामुळे माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांचं मंत्रिपद धोक्यात आलं असून, मंत्रिपद आणि आमदारकीवर टांगती तलवार आहे. दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट निघाल्यानं हा राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी ऐन महापालिका निवडणुकीपूर्वी मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये माणिकराव कोकाटे यांच्याकडे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. कोकाटे यांच्याकडे नाशिक, जळगाव आणि धुळे जिल्ह्याची आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने मोठी जबाबदारी सोपावली आहे. तसेच माणिकराव कोकाटे हे नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तर इतर तीन जिल्ह्यांचे ते संपर्कमंत्री आहेत. पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी ऑक्टोबर महिन्यात मोठी जबादारी सोपवली आहे. मात्र आज त्यांच्याविरोधात अटक वारंर जारी करण्यात आल्यानं हा राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात कोर्टानं अटक वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे देखील अडचणीत सापडले आहेत. ते सध्या रुग्णालयात असल्याची माहिती समोर आली आहे.