महायुतीमध्ये मोठी बंडखोरी, भाजपच्या अडचणी वाढल्या, उदय सामंत यांची मोठी घोषणा
राज्यात सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. अनेक जागांवर महायुतीकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील झाली आहे. या पर्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर आली आहे.

राज्यात सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. अनेक जागांवर महायुतीकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील झाली आहे. यामध्ये पुणे मतदारसंघातील दोन्ही जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत, तर अमरावतीची जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आली असून, छत्रपती संभाजीनगरमधून राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराची घोषणा करणार आहे. मात्र त्यापूर्वी आता एक मोठी बातमी समोर आली आहे. उदय सामंंत यांच्याकडून एक मोठी घोषणा करण्यात आली असून, यामुळे आता भाजपच्या अडचणी वाढणार आहेत.
पुण्यामधील दोन्ही मतदारसंघ शिक्षक आणि पदवीधर भाजपच्या वाट्याला आले आहेत. या मतदारसंघातून लढण्यासाठी सुरुवातीपासूनच शिवसेनेचे मंगेश चिवटे हे इच्छूक होते. मात्र आता शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आल्यामुळे या मतादारसंघातून मंगेश चिवटे यांचा पत्ता कट झाला आहे. मात्र जरी उमेदवारी मिळाली नसली तरी देखील याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर मंगेश चिवटे ठाम आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच मंगेश चिवटे यांना या मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्याची बातमी समोर आली होती.
मात्र आता मंत्री उदय सामंत यांच्या घोषणेमुळे यावर शिक्कामोर्तब झालं आहे. मंगेश चिवटे हे पुणे शिक्षक मतदारसंघामधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पुणे मतदारसंघावर आमचा दावा कायम आहे, मंगेश चिवटे हे आमचे उमेदवार असतील, ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील, भाजपाचा उमेदवार देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करेल. परंतु शेवटचा निर्णय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे घेतील असं यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं आहे. मंगळवारी मंगेश चिवटे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीमुळे भाजपाचं या मतदारसंघात टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. जर मंगेश चिवटे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला तर या बंडखोरीचा फटका हा भाजप उमेदवाराला बसू शकतो. त्यामुळे आता ही बंडखोरी मोडून काढण्याचं मोठं आवाहन पक्षासमोर असणार आहे.