Modi Cabinet Reshuffle : लवकरच केंद्रात दोन डझन मंत्री बदलणार, शिंदेंनाही हवय कॅबिनेट
याच महिन्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याची शक्यता आहे.

याच महिन्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे लवकरच केंद्रात दोन झडनपेक्षाही अधिक मंत्री बदलणार आहेत. काही मंत्र्यांकडे असलेली अतिमहत्त्वाची खाती कमी करून, त्यांच्याकडे कमी महत्त्वाची खाती दिली जाण्याची शक्यता आहे, तर काही मंत्र्यांकडे असलेली जबाबदारी आता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान या मंत्रिमंडळ विस्ताराकडे प्रादेशिक पक्ष देखील डोळे लावून बसले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या मंत्रिमंडळ फेरबदलामध्ये द्रमूकला देखील संधी मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांची देखील आपल्याला आणखी एक मंत्रिपद मिळावं अशी इच्छा आहे, सध्या स्थितीमध्ये त्यांच्याकडे 13 खासदार आहेत, त्यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील आपली इच्छा बोलून दाखवल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यात ऑपरेशन टायगर पूर्वी शिवसेना शिंदे गटाकडील खासदारांची संख्या केवळ सात इतकीच होती. परंतु शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे राज्यात आणि महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली आहे. सध्या स्थितीमध्ये राज्यात महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्वात जास्त खासदारांचा आकडा आहे. राज्यात शिंदेंकडे जेवढे खासदार आहेत, तेवढे खासदार भाजपकडे देखील नाहीत, त्यामुळे शिंदे यांची ही इच्छा पूर्ण होणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठारणार आहे.
धर्मेंद्र प्रधान पुन्हा मंत्रिमंडळात?
दरम्यान नीट परीक्षा पेपर फुटीप्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांच्यावर शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, सध्या शिक्षण मंत्रिपदाची जबाबदारी प्रल्हाद जोशी यांच्याकडे देण्यात आली आहे, नव्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पुन्हा एकदा धर्मेंद्र प्रधान यांची मोदींच्या मंत्रिमंडळात एन्ट्री होण्याची शक्यता आहे. फरक एवढाच असेल की यावेळी धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे शिक्षण खात्याची जबाबदारी न देता त्यांना एखादं दुसरं खातं मिळण्याची शक्यात आहे. यावरून धर्मेंद्र प्रधान यांच्यावर पक्षाचा विश्वास कायम असल्याचं दिसून येत आहे.
महिलांची संख्या वाढणार
दरम्यान मंत्रिमंडळ फेरबदलामध्ये महिलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. विशेष: दक्षिणेकडील राज्याच्या महिलांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश होऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत.
पीयूष गोयल यांचं मंत्रिपद कायम राहणार
पीयूष गोयल यांच्याकडे पक्षाने कोषाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. परंतु तरी देखील ते मंत्रिपदावर कायम राहण्याची शक्यता आहे. वाणिज्य मंत्री म्हणून अमेरिकेसोबत व्यापार करारावर वाटाघाटी करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे, याचंच बक्षीस म्हणून पीयूष गोयल हे जरी पक्षाचे कोषाध्यक्ष असले तरी ते मंत्रिपदी कायम राहू शकतात. अमेरिकेसोबत व्यापार करारासंदर्भात महत्त्वाची बोलणी सुरू आहेत, त्यामुळे अशा स्थितीमध्ये पीयूष गोयल यांच्याकडे असलेलं हे खातं बदलण्याची रिस्क महागात पडू शकते, त्यामुळे ते मंत्रिपदी कायम राहण्याची शक्यता आहे.
हरदीप सिंग पुरी यांना मिळणार डच्चू?
दरम्यान दुसरीकडे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ येत्या 25 नोव्हेंबर रोजी समाप्त होणार आहे. त्यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर संधी मिळणार की नाही हे अजून स्पष्ट नाहीये, त्यांना जर पुन्हा राज्यसभेची संधी मिळाली नाही तर त्यांना मंत्रिपद सोडावं लागणार आहे, त्यामुळे हरदीप सिंग पुरी याच्याबाबत काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
उत्तर प्रदेशातून मोठा चेहरा दिल्लीत जाणार
2027 मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक किंवा केशव प्रसाद मौर्य यांच्यापैकी एकाला केंद्रात संधी मिळू शकते अशी चर्चा आता सुरू झाली आहे. अमरपाल मौर्य यांना ओबीसी मोर्चाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर आता सध्या केंद्रात मंत्रिपदासाठी केशव प्रसाद मौर्य यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे केशव प्रसाद मौर्य यांना ब्रजेश पाठक यांचा देखील पर्याय आहे, त्यामुळे दोन्ही पैकी एकाला केंद्रात संधी मिळण्याची शक्यता आहे.