अखेर मुहूर्त ठरला? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मोठी अपडेट, कोअर कमिटीच्या घडामोडींना वेग

राजकीय वर्तुळातून एक मोठी अपडेट समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मध्यंतरी चर्चा थंडबस्त्यात गेली होती. पण आता या चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे. या महिन्याच्या अखेरीस शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे, त्यात मोठी हालचाल होण्याची शक्यता आहे.

अखेर मुहूर्त ठरला? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मोठी अपडेट, कोअर कमिटीच्या घडामोडींना वेग
राष्ट्रवादींचं विलिनीकरण
Image Credit source: एजन्सी
| Edited By: | Updated on: Aug 23, 2026 | 3:29 PM

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याला अचानक ब्रेक लागला. तर आता नवीन अपडेट समोर आली आहे. या महिन्याच्या अखेरीस ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कोअर कमिटीची बैठक बोलवली आहे. या बैठकीत दोन्ही पक्ष एकत्र येण्यावर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. यासोबतच पक्षाची पुढील भूमिका काय असेल हे ही ठरवण्यात येईल. या नवीन हालचालींमुळे पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

29 ऑगस्ट रोजी कोअर कमिटीची बैठक

अजितदादांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंबंधी अनेकदा चर्चा झाल्या. दोन्ही बाजूंनी दावे प्रतिदावे झाले. पण या चर्चा वांझोट्या ठरल्या. त्यातून आरोप-प्रत्यारोपाच्या खेळीशिवाय काहीएक हाती लागले नाही. भाजपसोबत राहायचे, जायचे की आघाडीसोबत घरोबा करायचा असे अनेक अंडरकरंट या संवाद-विसंवादातून समोर आले. तर या महिन्याच्या सुरूवातीला केंद्रीय स्तरावर अनेक घडामोडी समोर आल्या. भेटी-गाठीच्या सत्रांनी दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा झाली. पावसाळी अधिवेशन सरले पण काहीच घडले नाही. या महिन्याच्या अखेरीस पुन्हा चर्चा रंगली आहे.

या महिन्याच्या अखेरीस शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली. येत्या 29 ऑगस्टला कोअर कमिटीची बैठक होणार आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवारांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. पक्षाची पुढील भूमिका आणि विलीनीकरणाची शक्यता यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शरद पवार NDA च्या वाटेवर?

शरद पवार राष्ट्रवादी एनडीएच्या वाटेवर असल्याचा दावा गेल्या काही महिन्यांपासून करण्यात येत आहे. हे दावे अगोदरच पक्षातील खासदार आणि नेत्यांनी फेटाळले आहे. पण जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची भेट, शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, त्यानंतर पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जेन झीं आंदोलनानंतरची भेट, खासदारांच्या शिष्टमंडळाशी संवाद यातून चर्चांना पेव फुटले होते. संसदेत राष्ट्रवादी पक्ष, मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला विधेयकाला अनुकूल भूमिका घेणार असल्याचा दावा करण्यात येत होता. यंदा पावसाळी अधिवेशन विरोधकांनी सरकारची कोंडी केल्याचे चित्र दिसले. ही कोंडी फोडण्याचा प्रयत्नही यशस्वी ठरला नाही. यामुळे आता हिवाळी अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासाठी अजून वेळ आहे. तर शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार नसल्याची प्रतिक्रिया यापूर्वीच खासदार आणि नेत्यांनी दिली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us