मनोज जरांगे पाटलांच्या मुंबई दौऱ्याबाबत मोठी बातमी; पाटोद्यात हालचालींना वेग, मोठा निर्णय घेण्याची शक्यता

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस आहे. त्यांनी मंगळवारी मुंबईकडे प्रस्थान केलं आहे. आज त्यांचा मुक्काम श्रीगोंदा इथे असणार आहे. मात्र त्यापूर्वीच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

मनोज जरांगे पाटलांच्या मुंबई दौऱ्याबाबत मोठी बातमी; पाटोद्यात हालचालींना वेग, मोठा निर्णय घेण्याची शक्यता
Manoj Jarange Patil
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 16, 2026 | 12:20 PM

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस आहे. त्यांनी 12 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांची बैठक बोलावली होती. बारा सप्टेंबरला त्यांनी आपल्या मुंबई दौऱ्याची तारीख घोषीत केली, त्यानुसार त्यांनी 15 सप्टेंबर रोजी अतंरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेनं प्रस्थान केलं आहे. मंगळवारी त्यांचा मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे होता. दरम्यान त्यानंतर आज त्यांचा मुक्काम अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा इथे असणार आहे. मात्र त्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे.

मनोज जरांगे पाटलांच्या नियोजित दौऱ्यात बदल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाटोद्यात हालचालींना वेग आला आहे. मनोज जरांगे पाटील आता खोपोली मार्गे थेट मुंबईला जाण्याची शक्यता आहे. पाटोद्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न सुरू आहे.  प्रकृती खालावल्याने जिल्हा शल्य चिकित्सकांसह वैद्यकीय पथकाकडून उपचार करण्यासाठी आणि तपासणीसाठी प्रयत्न सुरू आहेत.  मात्र उपचार आणि तपासणीस जरांगे पाटलांनी नकार दिला आहे.   अद्याप जरांगे पाटील बाहेर आले नसून, त्यांनी  कोणाचीही भेट घेतलेली नाही. मनोज जरांगे पाटील यांनी आज एक वाजता तातडीची पत्रकार परिषद बोलावली आहे. ते माध्यमांशी संवाद साधणार आहे. दरम्यान यावेळी मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलणार? एखादी मोठी घोषणा करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

19 दिवसांच्या उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. ते मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घ्यावेत यासाठी वैद्यकीय पथकाकडून प्रयत्न सुरू आहेत, मात्र मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला परवानगी मिळावी यासाठी केलेल्या तिसऱ्या अर्जानंतर आता पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली आहे.  आंदोलनाबाबतची सविस्तर माहिती तात्काळ सादर करा असं या नोटीसमध्ये पोलिसांनी म्हटलं आहे. तसेच इतरही काही माहिती पोलिसांकडून मागवण्यात आली आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us