तरुणांनो आंदोलनं केली तर केसेस दाखल होतील, नोकऱ्या मिळणार नाहीत, ‘अग्नीपथ’वरून चंद्रकांत पाटलांचा इशारा काय?

ग्नीपथ योजनेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं तीव्र विरोध केला आहे. कृषी कायद्यांप्रमाणे केंद्रानं ही योजना रद्द करावी, यासाठी 20 जून रोजी राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन केलं जाणार आहे.

तरुणांनो आंदोलनं केली तर केसेस दाखल होतील, नोकऱ्या मिळणार नाहीत, अग्नीपथवरून चंद्रकांत पाटलांचा इशारा काय?
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 18, 2022 | 12:32 PM

मुंबईः केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्नीपथ (Agnipath Scheme) या सैन्य भरती योजनेविरुद्ध देशभरात आंदोलनं सुरु आहेत. मात्र आंदोलन करणारा तरुण हा सामान्य आहे. त्यांना विरोधकांकडून भडकवलं जात आहे. तरुणांनी थेट आंदोलनं करुण अनेक केसेस अंगावर घेताना हे लक्षात घ्यावं की अशा केसेस तुमच्या नावावर असतील तर कुठेही नोकऱ्या (jobs) मिळणार नाही. ही धमकी नाही तर वस्तुस्थिती आहे, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिला आहे. योजनेच्या अनुशंगाने काही सूचना आणि त्रुटी असतील तर त्या दुरुस्त केल्या जातील. मात्र काहीही मागण्या न करता थेट आंदोलन करणं, रेल्वे जाळणं चुकीचं असल्याचं मत चंद्रकांत पाटील यांनी नोंदवलं. केंद्रसरकारने 4 वर्षांच्या कंत्राटावर सैन्यभरती करण्याची अग्नीपथ नावाची योजना नुकतीच जाहीर केली आहे. मात्र एवढ्या कमी कालावधीसाठी भरती करण्यावरून विरोधकांकडून टीका होत आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

अग्नीपथ योजनेवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आंदोलनं अनेक होतात. पण काहीही मागण्या पुढे न करता थेट रेल्वे जाळणं असे प्रकार झाले. याचा अर्थ सामान्य युवक हा धाडस करत नाही. यातून केसेस दाखल झाल्या तर त्याचे नोकरीचे सर्व मार्गच बंद होतात. त्यामुळे आंदोलनातला हा सामान्य तरुण नाही. त्यामुळे अग्नीपथ योजना काय आहे, हे तरुणांनी आधी समजून घ्यावं. ती मान्य नसेल तर शांततामय मार्गाने चर्चा केली पाहिजे. आंदोलनाच्या मार्गाने तुम्ही तुमच्या पायावर कुऱ्हाड पाडून घेत आहात. तुमच्यावर केसेस दाखल होतील. कुठलीही नोकरी मिळणार नाही. मी भीती दाखवत नाही. मीही चळवळीत काम केलेलं आहे.

सोंग घेतलेल्यांना उठवणं कठीण असतं…

काँग्रेसच्या या विरोधकाला भाजप कसे सामोरं जाणार, या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘ अशा तरुणांना समजावून सांगता येईल. सैन्यदलातील निवृत्त अधिकाऱ्यांना काही सूचना असतील तर त्यांनी पुढे येऊन सांगावं. जसं की या योजनेतील भरतीचं वय 21 ऐवजी 23 वर्षे केलं गेलं. त्याामुळे चर्चेतून मार्ग निघू शकतो. झोपलेल्यांना झोपेतून उठवू शकतो, पण सोंग घेतलेल्यांना उठवणं कठीण असतं….

ठेकेदारीमुळे सैन्य दलाचा अपमान- संजय राऊत

दरम्यान, भारतीय सैन्य दलात अशा प्रकारे चार वर्षाच्या कंत्राटावर तरुणांची भरती करणे चुकीचं असल्याचं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. सैन्यात ठेकेदारी पद्धतीनं भरती झाली तर सैन्य रसातळाला जाईल. हा भारतीय सैन्यदलाचा आणि सुरक्षा व्यवस्थेचा अपमान आहे, असं संजय राऊत म्हणाले.

20 जूनला राज्यात आंदोलन

दरम्यान, अग्नीपथ योजनेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं तीव्र विरोध केला आहे. कृषी कायद्यांप्रमाणे केंद्रानं ही योजना रद्द करावी, यासाठी 20 जून रोजी राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन केलं जाणार आहे. देशसेवा करण्याची संधी सैनिक म्हणून तरुणांना द्यावी, मात्र त्याला ठेकेदारीचं स्वरुप देऊन युवकांचा अपमान करू नये, ठेकेदारी पद्धतीची सैन्यभरती भाजपला मागे घ्यावीच लागेल, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे घेण्यात आली आहे.