Madhukar Pichad : आदिवासी समाजासाठी लढणारा मोठा नेता हरपला, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन

भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 84 व्या अखेरचा श्वास घेतला. मधुकर पिचड यांना 15 ऑक्टोबरला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यांच्यावर गेल्या दीड महिन्यांपासून नाशिकच्या एका रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची प्राणज्योत आज मालवली आहे.

Madhukar Pichad : आदिवासी समाजासाठी लढणारा मोठा नेता हरपला, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन
| Updated on: Dec 06, 2024 | 7:09 PM

भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 84 व्या अखेरचा श्वास घेतला. मधुकर पिचड यांना 15 ऑक्टोबरला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यांच्यावर गेल्या दीड महिन्यांपासून नाशिकच्या एका रुग्णालयात उपचार सुरु होते. पण त्यांची आजारपणासोबत सुरु असलेली झुंज आज संपली आहे. मधुकर पिचड यांच्या निधनामुळे भाजपची वैयक्तिक मोठी हानी झाली आहे. मधुकर पिचड यांचं आदिवासी भागात मोठं काम आहे. ते राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री देखील होते. ते अहमदनगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघातून 1980 ते 2004 या काळात तब्बल 7 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. ते मार्च 1995 ते जुलै 1999 या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. त्यांनी 2019 मध्ये मुलगा वैभव पिचड यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपसाठी त्यांनी अहोरात्रदेखील काम केलं होतं.

मधुकर पिचड यांना सलग सात वेळा विधानसभेवर आमदार म्हणून अकोलेच्या‌ जनतेने निवडून दिलं होतं. मधुकर पिचड यांची जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकारणास सुरूवात झाली होती. त्यानंतर ते अनेक खात्यांचे मंत्री राहिले. त्यांच्याकडे आदिवासी विकास खात्याची जबाबदारी प्रदीर्घ काळ राहिली. त्यांनी अकोले तालुक्याच्या पर्यटनाला चालना मिळावी याकरता अथक प्रयत्न केले. ते आदिवासी बांधवांना रोजगार मिळावा यासाठी देखील नेहमी प्रयत्नशील राहिले.

अकोले तालुक्यात अनेक छोट्या धरणांची निर्मीती मधुकर पिचड यांच्या कार्यकाळात झाली. त्यांनी भंडारदरा धरणाला आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे नाव देण्यासाठी अनेकदा जन आंदोलन केलं. अखेर त्यांच्या लढ्याला यश आले. धरणाचं नामकरन नुकतंच आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे असे करण्यात आले आहे.

1972 मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवड ते 7 वेळा आमदार

मधुकर पिचड हे 1972 साली जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आणि अकोले पंचायत समितीचे अध्यक्ष झाले होते. त्यांनी 1980 पर्यंत त्या पदाचा कार्यभार सांभाळला. त्यानंतर ते 1980 मध्ये कॉंग्रेसच्या तिकीटावर आमदार झाले. त्यानंतर 1985, 1990 साली आमदादेखील आमदार म्हणून निवड झाली. मधुकर पिचड यांनी 1991 मध्ये आदिवासी विकास मंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर डेअरी विकास, पशुपालन आणि मत्स्यपालन मंत्रालयाची जबाबदारी देखील त्यांच्यावर देण्यात आली. 1995 साली ते पुन्हा चौथ्यांदा आमदार झाले आणि पुन्हा आदिवासी विकास मंत्री झाले.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी स्थापनेनंतर मधुकर पिचड कॉंग्रेस सोडून शरद पवारांसोबत गेले. 1999 साली ते पाचव्यांदा राष्ट्रावादीच्या तिकीटावर आमदार झाले. 2004 साली सहाव्यांदा तर 2009 मध्ये ते सातव्यांदा विधानसभेवर निवडून गेले. मधुकर पिचड यांनी अनेक वर्ष आदिवासी मंत्री म्हणून काम पाहिले. त्यांचे पुत्र वैभव पिचड हे 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या‌ तिकीटावर निवडून गेले आणि मधुकर पिचड राजकारणापासून काहीसे अलिप्त राहिले.