वाद पेटणार? भाजपच्या बड्या नेत्याने जरांगे पाटलांची अक्कलच काढली, नेमकं काय घडलं?

रस्त्यावर आणि नाक्यावर बसून आंदोलन करणं आणि सिस्टीममध्ये राहून काम करणं, यात खूप फरक आहे, जरांगे यांनी निवडून यावे आणि मग सिस्टीममध्ये राहून बोलून दाखवावे असेही या भाजपा नेत्याने म्हटले आहे.

वाद पेटणार? भाजपच्या बड्या नेत्याने जरांगे पाटलांची अक्कलच काढली, नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil
| Updated on: Aug 06, 2026 | 11:10 PM

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर विशेषत: देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी मराठ्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा हात असल्याचे म्हटले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्यावरील गद्दारीचा डाग आमच्यामुळे गेला, मात्र त्यांनी मराठ्यांशी डबल गेम खेळला असा जाहीर आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. जरांगे पाटील यांच्या आरोपांना एकीकडे फडणवीस, शिंदे, बावणकुळे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी सबुरीने उत्तर दिले असताना भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी मात्र जरांगे यांना कठोर शब्दात उत्तर दिले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या गंभीर आरोपाबद्दल विचारले असता भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी आरोप करायला फार अक्कल लागत नाही. ज्यांना सिस्टीमच समजून घ्यायची नाही, त्यांच्याबद्दल काय बोलायचे? असा सवाल केला आहे. ते पुढे म्हणाले की जात पडताळणी समितीला न्यायालयीन अधिकार आहेत. कुठलाही मंत्री हस्तक्षेप करू शकत नाही, लेखी आदेश देण्याचा तर विषयच नाही. काही त्रुटी असतील म्हणून नोंदी रद्द केल्या असतील. झोपलेल्याला जागं करता येतं, मात्र झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करता येत नाही अशा शब्दात दरेकर जरांगे यांच्यावर बरसले आहेत.

जरांगे यांनी अल्टिमेटम दिला आहे त्याबद्दल विचारले असता दरेकर म्हणाले की, जरांगे सतत अल्टिमेटम देत असतात. महाराष्ट्र सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारं राज्य आहे. त्यांनी माणसं तोडण्यापेक्षा, जोडण्याचं काम करावं, मराठा आणि ओबीसी वाद लावणं महाराष्ट्राच्या हिताचं नाही असाही सल्ला दरेकर यांनी दिला आहे.

जरांगे यांनी आमदार पाडण्याचा इशारा दिला आहे या संदर्भात विचारले असता दरेकर यांनी जरांगे यांनी कुठल्यातरी मतदारसंघातून उभं रहावं. विधीमंडळात आल्यावर त्यांना सिस्टीम समजेल. रस्त्यावर आणि नाक्यावर बसून आंदोलन करणं आणि सिस्टीममध्ये राहून काम करणं, यात खूप फरक आहे. ते जर 50 आमदार पाडू शकत असतील, तर त्यांना माझ्या शुभेच्छा असेही दरेकर यांनी म्हटले आहे.

काही मंत्र्यांकडून मराठा समाजाला त्रास दिला जातोय असा आरोप जरांगे यांनी केला आहे, त्याबद्दल विचारेल असता प्रवीण दरेकर म्हणले की आरोप करायला फार अक्कल लागत नाही. कुठल्या मंत्र्याने त्रास दिला त्यांचं नाव जरांगे यांनी सांगावं. आम्ही मराठा समाजाचे, पण आम्हाला कोणता मंत्री त्रास देत नाही. मुख्यमंत्री आम्हाला ताकद देतात. बावनकुळे हे सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणारे नेते आहेत. त्यांची प्रतिमा मलिन करणे योग्य नाही असेही प्रवीण दरेकर यांनी म्हटले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us