Maharashtra News LIVE: ठाण्यात डीजे बंद, पण ध्वनिप्रदूषण कायम, आवाज 105 डेसिबलपर्यंत
Maharashtra News LIVE: ठाण्यात डीजेवर बंदी घालण्यात आली आहे, तरी ध्वनिप्रदूषण कायम मात्र कायम आहे. तर अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली. यासह राज्य, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES
-
शिरूर तालुक्यातील धामारी-खैरेनगर रोड परिसरात बिबट्याचा वावर; रात्री पथदिवे नसल्याने शेतकऱ्यांचे जीवन धोक्यात
धामारी-खैरेनगर रोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर आढळून येत असल्याने परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या रस्त्यावर पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करणे धोकादायक ठरत आहे. शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतीची कामे, पिकांना पाणी देणे तसेच जनावरांची देखभाल करण्यासाठी घराबाहेर पडावे लागते. मात्र रस्त्यावर पथदिवे नसल्याने अंधाराचा फायदा घेऊन बिबट्याचा वावर वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या परिसरात तातडीने पथदिव्यांची व्यवस्था करण्यात यावी, तसेच वनविभागाने बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेऊन आवश्यक ती खबरदारीची उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.
-
पुणे-नाशिक रेल्वेचा गणेशोत्सवात देखावा; शेतमालाला बाजारपेठ मिळण्यासाठी युवकांचा अनोखा संदेश
उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पुणे-नाशिक प्रस्तावित रेल्वेमार्गाच्या मागणीवरून जनभावना तीव्र होताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या निमित्ताने जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथील सारंग बाबा नवतरुण मित्र मंडळाने पुणे-नाशिक रेल्वेचा देखावा सादर केला आहे. या देखाव्यामध्ये पुणे-नाशिक रेल्वेचा प्रस्तावित मार्ग खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा आणि संगमनेर या मार्गे दाखवण्यात आला आहे. या माध्यमातून परिसरातील युवकांनी रेल्वे मार्गाची आवश्यकता आणि त्यामागची स्थानिक शेतकऱ्यांची भावना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला स्थानिक बाजारपेठेपलीकडे देशातील विविध बाजारपेठांमध्ये योग्य भाव मिळावा, तसेच शेतमालाची वाहतूक सुलभ आणि कमी खर्चात व्हावी, यासाठी पुणे-नाशिक रेल्वे मार्ग महत्त्वाचा ठरू शकतो, अशी भावना मंडळातील युवकांनी व्यक्त केली आहे. गणेशोत्सवाच्या देखाव्याच्या माध्यमातून मांडलेली ही संकल्पना सध्या जुन्नर तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
-
-
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेची मोठी तयारी
नाशिक शहरातील ३० प्रमुख वाहतूक चौकांची सर्वंकष पुनर्रचना आणि सुधारणा होणार आहे. वाहतूक अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेकडून ‘रिक्वेस्ट फॉर प्रपोजल’ (RFP) प्रसिद्ध करण्यात आला आहे. चौकांचा प्रत्यक्ष अभ्यास करून वाहतुकीचा प्रवाह, वाहनांची संख्या आणि वळणांवरील अडथळे तपासले जाणार आहेत. सप्टेंबरअखेर किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सल्लागार नियुक्तीची शक्यता आहे.
-
कल्याण कोर्टात जामिनासाठी बनावट पत्ता अन् खोटी कागदपत्रे; पोलिसांच्या पडताळणीत प्रकार उघड, दोन जामीनदारांवर गुन्हा दाखल
अंमली पदार्थांच्या गुन्ह्यातील अटक आरोपी मनोजकुमार पांडे याच्या जामिनासाठी दोन जामीनदारांनी कल्याण न्यायालयात कागदपत्रे सादर केले होते. सलमान अहमद शेख (नालासोपारा) आणि सना फहीम खान (उल्हासनगर) यांनी न्यायालयात दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याचे पोलिसांच्या पडताळणीत समोर आले. दोघांनी आधारकार्ड, सातबारा उतारा, शिधापत्रिका आणि प्रतिज्ञापत्राद्वारे जामीन प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद. साहाय्यक अधीक्षक मुकुंद कांबरी यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलिसांनी दोन्ही जामीनदारांविरोधात गुन्हा दाखल करत पोलीस तपास केला सुरू.
-
कळंबमध्ये गावठी पिस्टलसह एकाला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
कळंब तालुक्यातील भाटसांगवी पाटीजवळ गावठी पिस्टलसह एका व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. आरोपीकडून गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस, जप्त करण्यात आले. आरोपीविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या पथकाची कारवाई केली असून नवनाथ उर्फ बालाजी बब्रुवान काळे असे आरोपीचे नाव आहे.
-
-
अमरावती शहरात मोकाट श्वानाचा हैदोस, अमरावती शहरात रोज दहा जणांना डॉग बाईट
अमरावती शहरात मोकाट श्वानाचा हैदोस दिसत आहे. अमरावती शहरात रोज दहा जणांना डॉग बाईट होत आहे. प्रशासनाचं दुर्लक्ष होत असून श्वानाचें निर्भीजीकरणही बंद करण्यात आलं आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
-
बाप्पांच्या विसर्जन मिरवणूकित डीजे बँजोच्या तालावर खासदार अनिल बोंडे यांनी धरला ठेका
अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील अंबाडा येथे गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणूकित डीजे बँजोच्या तालावर खासदार अनिल बोंडे यांनी धरला ठेका. यावेळी खासदार बोंडे यांच्या पत्नी देखील उपस्थित होत्या त्यांनी देखील ठेका धरला. दरम्यान बोंडे दाम्पत्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
-
रावेरमध्ये घरगुती गणपती विसर्जनावरून दोन गटात दगडफेक
रावेरमध्ये घरगुती गणपती विसर्जनावरून दोन गटात दगडफेक झाली आहे. दोन ते तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती घटने संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या ठिकाणी शांतता असून पोलीस तैनात असून कुठलीही अफवा पसरू नका असं आव्हान पोलिसांनी केला आहे.
ठाण्यात डीजेवर बंदी घालण्यात आली आहे, तरी ध्वनिप्रदूषण कायम मात्र कायम आहे. विसर्जन मिरवणुकीत डीजेचा आवाज 105 डेसिबलपर्यंत गेला. डीजे बंदीचा परिणाम मात्र ढोल-ताशांच्या गजरात ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न कायम राहिला आहे. अशात ठाण्यात विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषणाचा कहर पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर, अहिल्यानगरच्या शेवगाव शहरातील खंडोबानगर येथील खंडोबा मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली. गौतमीची एक झलक पाहण्यासाठी अनेकांनी मोठी गर्दी केली आहे. तर दुसरीकडे डोंबिवलीत मोबाईल दुकानाचं शटर उचकटून महागडे मोबाईल आणि रोकड लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्ररकरणी विष्णुनगर पोलिसांनी तिघांना आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. 9 महागडे मोबाईल, चार्जर आणि इतर साहित्य देखील जप्त करण्यात आली आहे. तर पोलिसांचा याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची देखील माहिती समोर येत आहे. यासह राज्य, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
Published On - Sep 21,2026 8:06 AM
