North Korea Missile Test : किम जोंग उनच्या उत्तर कोरियाने काल असं कुठलं मिसाइल डागलं, ज्यामुळे अमेरिका-जपान इतके हादरले
North Korea Missile Test : उत्तर कोरियाने काल पुन्हा एकदा मिसाइल चाचणी केली. त्यामुळे कोरियाई उपखंडात तणाव वाढला आहे. आठवड्याभराच्या आत उत्तर कोरियाने केलेली ही दुसरी मिसाइल चाचणी आहे.

उत्तर कोरियामुळे पुन्हा एकदा कोरियाई उपखंडात तणाव वाढला आहे. त्यांनी रविवारी पुन्हा एकदा मिसाइल चाचणी केली. आपल्या पूर्व किनाऱ्यावरुन त्यांनी दोन मिसाइल्स डागली. आठवड्याभराच्या आत उत्तर कोरियाने केलेली ही दुसरी मिसाइल चाचणी आहे. दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयानुसार, दोन्ही शॉर्ट रेंज बॅलेस्टिक मिसाइल्स होत्या. वॉनसन भागात हे मिसाइल्स डागण्यात आले. दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ्ट ऑफ स्टाफने दिलेल्या माहितीनुसार, “पहिलं मिसाइल रविवारी दुपारी 3 वाजता डिटेक्ट केलं. जवळपास 450 किलोमीटरचं अंतर या मिसाइलने कापलं” दक्षिण कोरियाच्या अंदाजानुसार, हे मिसाइल ह्वासोंग-11 सीरीजचं असू शकतं. जपानच्या संरक्षण मंत्रालयाने सुद्धा हे बॅलेस्टिक मिसाइल असल्याचं म्हटलं.
पहिली मिसाइल डागल्यानंतर जवळपास तीन तासांनी उत्तर कोरियन सैन्यावे दुसरी शॉर्ट रेंज मिसाइल डागली. रविवारी संध्याकाळी 5.50 च्या सुमारास वॉनसन येथून हे मिसाइल लॉन्च करण्यात आलं. दक्षिण कोरियाच्या माहितीनुसार, दुसऱ्या मिसाइलने 650 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापलं. हे मिसाइल जपानच्या एक्सक्लूसिव इकोनॉमिक जोन म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्राच्या बाहेर जाऊन पडलं. मिसाइलचं नाव आणि त्याच्या वर्जन बद्दलची माहिती समोर आलेली नाही.
तात्काळ हे प्रकार थांबवावेत
दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा लॉन्चच्या पहिल्या टप्प्यापासून शेवटपर्यंत या मिसाइल चाचणीवर लक्ष ठेऊन होत्या. दोन्ही देशांनी जपानला सुद्धा या मिसाइल चाचणीची माहिती दिली. दक्षिण कोरियाच्या नॅशनल सिक्योरिटी काउंसिलने या मिसाइल चाचणीचा निषेध केला. उत्तर कोरियाने तात्काळ हे प्रकार थांबवावेत असं म्हटलं आहे. ही चाचणी म्हणजे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाचं थेट उल्लंघन आहे असं काउंसिलने म्हटलय.
उत्तर कोरियाची भूमिका काय?
जपानने सुद्धा राजनैतिक माध्यमातून उत्तर कोरियाच्या या कृतीचा विरोध केला. उत्तर कोरियाची ही कृती जपानसह संपूर्ण क्षेत्र आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या शांततेला, सुरक्षेला धोका निर्माण करणारी आहे असं जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइजुमी म्हणाले. याआधी उत्तर कोरियाने अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपानच्या संयुक्त युद्ध सरावावर नाराजी व्यक्त केलेली. किम जोंग उनची बहिण किम यो जोंगने अमेरिकेमुळे तणाव निर्माण होत असल्याचं म्हटलं होतं.अणवस्त्र मजबूत करण्याच्या धोरणात कोणताही बदल होणार नाही हे उत्तर कोरियाने स्पष्ट केलं आहे.
