गर्भावस्थेत विधिमंडळाच्या दाराशी…; भाजप महिला आमदाराची भावूक पोस्ट

MLA Namita Mundada at Vidhanbhavan With Her Daughter : लेक वियाना हिला घेऊन भाजप आमदार नमिता मुंदडा या विधिमंडळात आल्या. यावेळी त्यांनी पाच वर्षांआधीची आठवण सांगितली. तसंच लेकीसोबतचे विधिमंडळातील फोटोही शेअर केलेत. वाचा आमदार नमिता मुंदडा यांची पोस्ट...

गर्भावस्थेत विधिमंडळाच्या दाराशी...; भाजप महिला आमदाराची भावूक पोस्ट
नमिता मुंदडा, आमदार, भाजप
Image Credit source: Facebook
| Updated on: Dec 08, 2024 | 2:53 PM

आई… तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असाल तर आईपण तुम्हाला अधिक बळ देतं. एखादी स्त्री जर आई झाली तर ती अधिक ताकदीने संकटांना सामोरी जाते. तिचं आईपण कधीच तिच्या कामाच्या आड येत नाही, हे अनेक महिलांनी सिद्ध केलं आहे. राजकीय जीवनात वावरत असताना नेत्यांच्या पाठीमागे कामाचा ताण असतो. लोकांच्या भेटीगाठी असतात. अशात कुटुंबाला वेळ देणं तसं पाहिलं तर तारेवरची कसरत असते. पण जर तुम्ही आई असाल तर मात्र आपल्या मुलांसाठी तुम्ही वेळ काढताच…. बीडमधील केडच्या आमदार नमिता मुंदडा या लाडकी लेक वियानाला घेऊन अधिवेशनाला आल्या होत्या. याबद्दल त्यांनी फेसबुकवर भावूक पोस्ट शेअर केलीय.

लेक वियाना ही दोन महिन्यांची होती, तेव्हा नमिता मुंदडा तिला घेऊन विधिमंडळात आल्या होत्या. त्यावेळी दोन महिन्यांच्या लेकीला घेऊन विधिमंडळात आल्याने प्रचंड चर्चा झाली होती. आता नमिता यांची लेक वियाना पाच वर्षांची झाली आहे. तिला घेऊन नमिता मुंदडा विधिमंडळाच्या अधिवेशनात आल्या होत्या. फडणवीस सरकारचं पहिलं विशेष अधिवेशन होत आहे. या विशेष अधिवेशन काळात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. या पहिल्या दिवशी नमिता लेक वियानाला घेऊन आल्या होत्या.

नमिता मुंदडा यांची फेसबुक पोस्ट

पाच वर्षांपूर्वीची ती सकाळ अजूनही माझ्या मनात कोरलेली आहे. गर्भवती अवस्थेत, हृदयात असंख्य स्वप्नं, भीती आणि अनेक जबाबदाऱ्या घेऊन मी पहिल्यांदा विधिमंडळाच्या दाराशी उभी होते. माझ्या पोटात वाढत असलेल्या छोट्या जीवाने मला त्या क्षणाला आधार दिला, जणू तिच्या स्पंदनातून ती म्हणत होती,”आई, तू हे करू शकतेस !”

आज पाच वर्षांनंतर तीच माझी चिमुकली कन्या वियाना आता पाच वर्षांची झाली आहे. तिच्या छोट्या हातात हात धरून पाच वर्षानंतर पुन्हा एकदा मी शपथविधिच्या निमित्ताने विधिमंडळाच्या दारात उभी आहे. हा क्षण माझ्यासाठी एक आमदार म्हणूनच नव्हे तर एक आई म्हणून खूप आनंददायी आहे.

तिच्या डोळ्यांत माझ्याबद्दलचा अभिमान पाहून माझं हृदय भरून आलंय. तिच्या लहानशा हातांनी माझं बोट घट्ट धरलेलं पाहून वाटतंय – संघर्षाचा प्रत्येक क्षण, त्यागाचं प्रत्येक पाऊल सार्थ ठरलं.