
राज्यात हिंदी आणि मराठी भाषेचा वाद चांगलाच पेटला, यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजप खासदार निशिकांत दुबे हे आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. ‘दुबे को डुबे-डुबे के मारेंगे’ असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना दुबे यांनी शेवटी मी राज ठाकरे यांना हिंदी शिकवलीच असं ट्विट केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांना डिवचलं आहे.
नेमकं काय म्हणाले दुबे?
महाराष्ट्र आणि मुंबईच्या जडणघडणीमध्ये उत्तर प्रदेश, बिहार आणि हिंदी भाषिक लोकांचं देखील मोठं योगदान राहिलं आहे. आणि आज देखील तुमची जी अर्थव्यवस्था आहे. त्या अर्थव्यवस्थेत आम्ही देखील योगदान देत आहोत. आम्ही असा दावा नाही करत की फक्त आम्हीच अर्थव्यवस्थेमध्ये योगदान देत आहोत. मात्र आम्ही पण त्यामध्ये भर घालत आहोत. तुम्ही कोणत्या आधारे मारहाण करत आहात? इंग्रजी बोलताना कोणालाच काही समस्या वाटत नाही, इंग्रजी बोलायला तुम्ही कधीपासून सुरू केली? इंग्रज जेव्हा भारतात आले असतील 1760-65 च्या दरम्यान तेव्हापासूनच इथे इंग्रजी बोलली जाऊ लागली. मात्र यापूर्वी इथे कोणी इंग्रजी बोलत नव्हतं.
जेव्हा -जेव्हा मुंबई महापालिकेची निवडणूक असते, तेव्हा-तेव्हा मनसे आणि जेव्हा मनसे पक्ष नव्हता त्यापूर्वी शिवसेना हेच काम करत होते. पण सर्वात मोठं कन्फ्यूजन हे आहे, ते म्हणजे मुंबईमध्ये केवळ 30 टक्के लोकच मराठी बोलतात. बारा टक्के लोक उर्दु बोलतात, म्हणजे ते मुस्लिम आहेत. मराठी इतकेच म्हणजे 30 टक्के लोक हिंदी भाषा बोलतात. अडीच टक्के लोक राजस्थानी बोलतात, त्याचप्रमाणे काही लोक गुजराती बोलतात, भोजपुरी बोलतात त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं हे भाषेवरच राजकारण आहे, ते यावेळी पूर्णपणे फसणार आहे, असं दुबे यांनी म्हटलं आहे. ते एक पैसा कमावण्याचं साधन आहे, ते जेव्हा संपेल तेव्हा सगळेच त्यांच्यांविरोधात मतदान करतील तेव्हा त्यांना अशाप्रकारचं राजकारण करण्याची संधी मिळणार नाही असं दुबे यांनी म्हटलं आहे.