‘जगावं की मरावं…’, कुकडीच्या पाण्यावरुन शेतकऱ्यांचा आर्त सवाल, राम शिंदे-रोहित पवार आमनेसामने

| Updated on: May 13, 2021 | 3:17 PM

राम शिंदे यांनी रोहित पवारांना जाब विचारत शेतकऱ्यांना कुकडीचं पाणी का मिळालं नाही, याचं उत्तर आमदार रोहित पवार यांनी द्यावं, अशी मागणी केली आहे. (Ram Shinde Slam Rohit pawar Over Kukdi Water)

जगावं की मरावं..., कुकडीच्या पाण्यावरुन शेतकऱ्यांचा आर्त सवाल, राम शिंदे-रोहित पवार आमनेसामने
राम शिंदे आणि रोहित पवार
Follow us on

अहमदनगर : कुकडीच्या आवर्तनावरुन नगर आणि पुणे जिल्हा असा वाद चिघळण्याची शक्यता आहे. करमाळा-कर्जत-श्रीगोंदा-पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारं कुकडीचं पाणी यंदा मिळणार नसल्याने शेतकरी नाराज झाले आहे. तर शेतातील उभे पीक जळून जाऊ लागल्याने शेतकऱ्यांनी नगरचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या समोर त्यांची व्यथा मांडली आहे. ‘साहेब कुकडीचं पाणी आलं नाही. यामुळे अनेक अडचणी आल्या आहेत. आम्ही जगायचं कसं, आम्ही शेतकऱ्यांनी आत्महत्या करावी का?’, असा उद्विग्न सवाल शेतकऱ्यांनी केला. या सगळ्या प्रकारानंतर राम शिंदे (Ram Shinde) यांनी रोहित पवारांना (Rohit pawar) जाब विचारत शेतकऱ्यांना कुकडीचं पाणी का मिळालं नाही, याचं उत्तर आमदार रोहित पवार यांनी द्यावं, अशी मागणी केली आहे. (BJP Ram Shinde Slam Rohit pawar Over Kukdi Water)

कोरोना संकटात राजकारण करायचं नाही. मात्र ज्यांच्या हातात राजकारण आहे त्यांनी अन्याय करु नये, अशी टीका राम शिंदे यांनी केलीये. तसेच कुकडीच पाणी मिळालं नाही याचा हिशोब आमदार रोहित पवार यांनी दिला पाहिजे. अन्यथा तीव्र आंदोलन करु, असा इशारा राम शिंदे यांनी दिलाय. त्यामुळे कुकडीच्या आवर्तनावरून राम शिंदे आणि रोहित पवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

कुकडीच्या आवर्तनाला स्टे मिळायचं इतिहासातलं हे पहिलंच वर्ष

इतिहासात कुकडीच्या आवर्तनाला स्टे मिळायचं हे पहिलंच वर्ष आहे. त्याचं कारण पालकमंत्र्यांनी टंचाई घोषित केली नाही. तहसीलदारांनी तसा प्रस्ताव तयार केला नाही. कालवा समितीमध्ये तशी चर्चा झाली नाही. म्हणून हायकोर्टात स्टे आला. आता इथून पुढे जर उठवायचा म्हटलं तर तोपर्यंत पावसाळा आला. म्हणजेच तालुक्यातील शेतकऱ्यांना आता काय पाणी भेटत नाही. याला सर्वस्वी जबाबदार तालुक्याचे कारभारी आहेत, अशी टीका राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर केली.

रोहित पवारांची कोंडी?

कुकडीच्या पाण्याचं नियोजन आधीच करावं लागते, पण तसं काही झालं नाही. ऐन उन्हाळ्यात कुकडीच्या आवर्तनावर स्टे आला. यावर कर्जत-जामखेडचे आमदार म्हणून रोहित पवार काही आवाज उठवतांना दिसत नाहीयेत. निवडणुकाच्या वेळी कुकडीच्या पाण्यासंदर्भात आग्रही भूमिका मांडणारे आता कुठं गेले, असा सवाल लोक आता विचारु लागले आहेत.

निवडणुकीच्या वेळी कुकडी आवर्तनाचा मुद्दा महत्वाचा होता, त्यावेळी रोहित पवारांनी काहीही झालं तरी आवर्तन सोडू, असे आश्वासन जनतेला दिले होते. मात्र तसे सध्या तरी पाहायला मिळत नाही. सध्या ते कुकडीच्या पाणी प्रश्नावर काहीच बोलत नाही. त्यामुळे रोहित पवार यांची या मुद्द्यावर कोंडी झालीये का? असा प्रश उपस्थित केला जातोय.

न्यायालयाची आवर्तनास स्थगिती का?

कुकडी प्रकल्प आठमाही आहे. त्यामुळे कुकडीचं पाणी बंद करावे, अशी मागणी जुन्नर येथील याचिकाकर्ते प्रशांत औटी यांनी न्यायालयाकडे केली होती. त्यावर न्यायालयाने आवर्तनास स्थगिती दिली होती.

(BJP Ram Shinde Slam Rohit pawar Over Kukdi Water)

हे ही वाचा :

कर्जत पंचायत समिती सभापती निवडीत रोहित पवारांचं वर्चस्व, राष्ट्रवादीच्या मनिषा जाधव बिनविरोध

माजी मंत्री राम शिंदेंना मिळाला कलेक्टर जावई, ‘व्हॅलेंटाईन डे’ला सुपारी फुटली