
भाजप पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. सध्या सतीश ऊर्फ खोक्या भोसले हा फरार आहे. सतीश भोसलेचा पोलिसांसह वनविभागही शोध घेत आहे. त्यातच आता सतीश उर्फ खोक्या भोसलेचे पाय अजून खोलात गेले आहेत. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या विरोधात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे तो अडचणीत आला आहे.
सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरी ८ मार्च रोजी वन विभाग आणि पोलिसांनी झाडाझडती घेतली होती. त्या झाडाझडतीवेळी गांजा सापडला होता. या गांजाची किंमत काळ्या बाजारात 7 हजार 200 इतकी आहे. हा 600 ग्रॅम सुका गांजा वनविभागाने जप्त केला होता. त्यासोबतच वनविभागाच्या गट क्रमांक 51 मध्ये अतिक्रमित असलेल्या सतीश भोसलेच्या घरातून त्यादिवशी प्राण्याचे वाळलेलं मास देखील जप्त करण्यात आले होते.
यानंतर सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या विरोधात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन सतीश उर्फ खोक्या भोसलेविरोधात NDPS कायद्यातंर्गत कलम 20 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या १५ ते २० दिवसात शिरूर कासार पोलीस ठाण्यात हा तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या अटकपूर्व जामीनात नवा अडथळा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिरुर कासार पोलिसांकडून काल रात्री सतीश भोसलेची गाडी जप्त करण्यात आली. रायमोहा परिसरातून त्याची गाडी जप्त करण्यात आली आहे. सतीश उर्फ खोक्या भोसलेला पकडण्यासाठी बीड पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. सतीश भोसलेची जप्त केलेली गाडी शिरूर कासार पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली आहे. सतीश भोसलेने हीच गाडी गुन्ह्यात वापरल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान सतीश भोसलेने टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. त्यावेळी त्याने सर्व आरोपांना खोडून काढले आहे. “मी जर २०० हरणांची शिकार केली असं माऊली शिरसाट म्हणतोय, तर मग त्याने त्यावेळी तक्रार का दाखल केली नाही. २०० हरणं मारणं म्हणजे जोक नाही. तुम्ही त्याची शहानिशा करा. हे असले लोक माझ्याविरोधात मोर्चा काढतात, आंदोलन करतात, त्यात किती सत्य आहे, हे तुम्ही पाहा. त्याला फक्त स्वत:ला मोठं करायचं आहे. तुमची काय परिस्थिती आहे, तुम्ही काय लोक आहेत याची जाण ठेवा. दोन दिवसांपूर्वी मला त्याचा फोन आला होता, तेव्हा मी त्याला आपण बसून बोलू, असं म्हटलं होतं आणि आज तो माझ्याविरोधात बोलतोय का, जातीचा मुद्दा काढतोय का?” असे आरोप खोक्या भोसले म्हणाला होता.