
पुण्याच्या कोंढवा परिसरात गँगवॉर झेडले गेले असून एका रिक्षा चालकाची गोळीबार आणि कोयत्याने वार करुन शनिवारी ( १ नोव्हेंबर २०२५ ) हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. रिक्षा चालक गणेश काळे याच्यावर सात गोळ्या झाडून मारेकऱ्यांनी त्याच्यावर कोयत्याने वार करुन त्याची हत्या केली आहे. गणेश काळे हा वनराज आंदेकर प्रकरणात तुरुंगात असलेल्या समीर काळे याचा भाऊ आहे. वनराज आंदेकर टोळीचा काय नेमका इतिहास आहे हे पाहूयात…
पुणे शहरात गुन्हेगारी क्षेत्रात आंदेकर या कुटुंबांचा रक्तरंजित इतिहास पाच दशकांचा असल्याचे म्हटले जात आहे. माजी नगरसेवक असलेल्या वनराज आंदेकर याची गेल्यावर्षी पुण्यातील नाना पेठेत चार दुचाकीवरुन आलेल्या मारेकऱ्यांनी अवघ्या दहा सेंकदात हत्या केली होती. वनराज आंदेकर याच्या हत्येला त्याच्या दोन सख्ख्या बहिणीसोबतचा मालमत्तेचा वाद कारणीभूत ठरल्याचे म्हटले जाते.
वनराज आंदेकर याचे त्याच्या दोन सख्ख्या बहिणी संजीवनी आणि कल्याणी तसेच मेहुणे जयंत आणि गणेश लक्ष्मण कोमकर यांच्या सोबत वाद झाले होते. या हत्येनंतर पोलिसांनी संजीवनी, कल्याणी, मेहुणे जयंत आणि गणेश यांच्यासह सोमनाथ गायकवाड या प्रमुख आरोपीसह एकूण दहा जणांना अटक झाली होती.
७० च्या दशकात जुन्या कपड्यांच्या बदल्यात भांडी विकण्याचा व्यवसाय आंदेकर कुटुंब करत होते. त्यानंतर या कुटुंबाने जुगार, मटका, खंडणी असा मार्गाने गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश केला.
बाळकृष्ण आंदेकर याने ही टोळी सुरु केली होती. त्यानंतर त्याचा साथीदार प्रमोद माळवदकर याने स्वतंत्र होत दुसरी टोळी सुरु केली. त्यानंतर पुण्यात आंदेकर आणि माळवदकर असे गँगवॉर सुरु झाले. या टोळी युद्धात आंदेकर टोळीने पुढे प्रमोद माळवदकर याच्या वडीलांची १९७८ मध्ये हत्या केली. त्यानंतर माळवदकर टोळीने बदला घेण्यासाठी बाळकृष्ण आंदेकर याची १९८४ मध्ये हत्या केली.
बाळकृष्ण आंदेकर याच्या हत्येनंतर या टोळीची सर्व सूत्रे नंतर त्याचा चुलत भाऊ सुर्यकांत आंदेकर याच्याकडे आली. सुर्यकांत आंदेकर याला हत्येच्या खटल्यात जन्मठेप झाली. या टोळीयुद्धातून पुण्यात लागोपाठ सहा हत्या झाल्या होत्या. त्यानंतर पुणे पोलिसांनी १९९७ मध्ये प्रमोद माळवदकर याला एन्काऊंटरमध्ये ठार केल्यानंतर हे टोळीयुद्ध अखेर शांत झाले.
आंदेकर कुटुंबाने त्यानंतर राजकारणात पाय पसरायला सुरुवात केली. बाळकृष्ण आंदेकर याची बहिण वत्सला आंदेकर ही १९९७ मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्या आणि १९९८ मध्ये सुरेश कलमाडी यांच्या पाठींब्यावर पुण्याच्या महापौर बनल्या. जन्मठेपेच्या शिक्षेवर तुरुंगात गेलेल्या सुर्यकांत आंदेकर यांच्या पत्नी राजेश्री आंदेकर या देखील नगरसेविका म्हणून निवडून आल्या. तसेच पुढे आंदेकर कुटुंबातील सदस्य असलेले रमाकांत, गणेश, उदयकांत आणि वनराज हे देखील नगरसेवक म्हणून निवडून आले.
आंदेकर कुटुंबातील सुर्यकांत आणि राजेश्री यांचा मुलगा वनराज आणि मुली संजिवनी आणि कल्याणी या होय. यानंतर या सख्ख्या बहिण-भावांमध्ये मालमत्ता आणि वर्चस्वातून संघर्ष पेटला. त्यातून जयंत कोमकर आणि सोमनाथ गायकवाड याचा साथीदार निखिल आखाडे याच्यावर सुर्यकांत आंदेकर याने हल्ला केला. त्यामुळे सुर्यकांत आंदेकर याच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. त्यानंतर राजकीय वरदहस्ताने सुर्यकांत आंदेकर याला जामीन मिळाल्याने चिडलेल्या जयंत कोमकर आणि सोमनाथ गायकवाड यांनी वनराज आंदेकर याचा काटा काढला आणि त्याची निर्घृण हत्या केली.
वनराज आंदेकर याच्या हत्येच्या आरोपाखाली वनराजच्या सख्ख्या बहिणी संजीवनी, कल्याणी आणि मेहुणे जयंत, गणेश कोमकर यांना अटक झाली.टोळी युद्धातून एकमेकांच्या टोळीतील माणसांचा गेम करताना अखेर या कुटुंबातच टोळीयुद्ध सुरु झाले. सख्ख्या बहिणींनी भावाची हत्या केली.