महापालिका निवडणुकीनंतर महायुतीत वादाची ठिणगी, भाजपने शिंदेंना डिवचले, थेट दिल्ली दरबारी तक्रार

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ८९ जागा जिंकून मोठे यश मिळवले असले तरी, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या सुमार कामगिरीमुळे महायुतीत अंतर्गत वाद सुरू झाला आहे.

महापालिका निवडणुकीनंतर महायुतीत वादाची ठिणगी, भाजपने शिंदेंना डिवचले, थेट दिल्ली दरबारी तक्रार
eknath shinde devendra fadnavis
| Updated on: Jan 20, 2026 | 2:01 PM

महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. महापालिका निवडणुकांचा निकालही जाहीर झाला असून यात महायुतीला बऱ्याच ठिकाणी घवघवीत यश मिळाले आहे. मुंबई महापालिकेत भाजपला ८९ जागांवर विजय मिळवता आला. त्यामुळे तो सर्वात मोठा पक्ष ठरला. तर शिवसेना शिंदे गटाला २९ जागा जिंकता आल्या. मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता महायुतीमध्ये अंतर्गत कलह निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने जास्त जागा लढवल्यामुळे भाजपच्या स्ट्राइक रेटवर परिणाम झाला आहे. यामुळे मुंबईत भाजपचे मोठे नुकसान झाल्याची भावना भाजपच्या गोटातून व्यक्त केली जात आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनंतर महायुतीमध्ये विजयाचा जल्लोष साजरा होत असला तरी पडद्यामागे मात्र मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सुमार कामगिरीमुळे मुंबईत भाजपला अपेक्षित यश मिळालेले नाही, असा गंभीर सूर आता भाजपच्या गोटातून उमटू लागला आहे. या संदर्भात भाजपच्या राज्यातील बड्या नेत्यांनी थेट केंद्रीय नेतृत्वाकडे धाव घेत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

भाजप नेत्यांच्या मते, जागावाटपात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने हट्ट धरून जास्त जागा घेतल्या, ज्याचा फटका संपूर्ण युतीला बसला. भाजपने १३५ जागा लढवल्या होत्या, त्यापैकी ८९ जागांवर विजय मिळवून आपला दबदबा कायम राखला. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ९० जागा लढवल्या, मात्र त्यांना केवळ २९ जागांवर समाधान मानावे लागले. जर भाजपने या ९० पैकी अधिक जागा लढवल्या असत्या, तर भाजप स्वबळावर १०० चा आकडा सहज पार करू शकला असता. त्यामुळे महायुतीला काठावरचे बहुमत मिळण्याऐवजी स्पष्ट आणि मोठे बहुमत मिळाले असते, असे गणित भाजप नेत्यांनी हायकमांडसमोर मांडले आहे.

केवळ जागावाटपच नाही, तर निवडणुकीनंतर आता एकनाथ शिंदे हे ज्या पद्धतीने हॉटेल पॉलिटिक्स करत आहेत, त्यावरही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार करण्यात आली आहे. शिंदे यांच्या रणनीतीमुळे महायुतीची प्रतिमा मलिन झाली. याचा मोठा परिणाम होत आहे, असा ठपका भाजप नेत्यांनी ठेवला आहे. यामुळे आगामी काळात महायुतीमध्ये मोठा भाऊ कोण, यावरून पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे.

ठाकरे आणि मनसेची नवी युती?

एकीकडे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडलेली असतानाच, विरोधी गटात मात्र मोठ्या हालचाली सुरू आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची शिवतीर्थवर जाऊन भेट घेतली. त्यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उद्या बुधवारी सकाळी ११ वाजता शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक एकत्रितपणे कोकण भवन येथे जाणार आहेत.

तसेच पालिकेकडून गॅझेट प्रसिद्ध झाल्यानंतर आता अधिकृत गट स्थापन करण्यासाठी दोन्ही पक्षांनी हातमिळवणी केल्याचे चित्र आहे. येत्या २३ तारखेच्या एका एकत्रित कार्यक्रमाबाबतही या भेटीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे.

काँग्रेस आज करणार नगरसेवकांची नोंदणी

तर दुसरीकडे, मुंबई महापालिकेत २४ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसनेही आपली रणनीती आखली आहे. अनुभवी नगरसेवक आश्रफ आझमी यांच्या नावावर गटनेते म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आझमी हे तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. काँग्रेसचे सर्व २४ नगरसेवक काही वेळातच कोकण भवन येथे जाऊन आपल्या गटाची नोंदणी करणार आहेत.