लालबागच्या राजाच्या प्रसादापासून BMC हॉस्पिटल्स प्रकाशित होणार, कसे ते वाचा…

सणासुदीच्या काळात कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा नाविन्यपूर्ण उपक्रम बीएमसीने हाती घेतला आहे. यात ११ दिवसांत सुमारे ८० टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन आहे.

लालबागच्या राजाच्या प्रसादापासून BMC हॉस्पिटल्स प्रकाशित होणार, कसे ते वाचा...
Lalbaugcha Raja file photo
| Edited By: | Updated on: Sep 11, 2026 | 5:27 PM

गणेशोत्सवातील कचरा व्यवस्थापनातून ऊर्जा निर्मिती केली जाणार असून त्याद्वारे मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालयांनी वीज पुरवठा केला जाणार आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सहकार्याने ‘प्रसाद टू पॉवर’ (Prasad to Power) हा विशेष प्रकल्प साकारला जात आहे. या प्रकल्पात प्रसाद कक्ष आणि अन्नछत्रातून निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन वीज निर्मिती केली जाणार आहे.

गणेश उत्सवाच्या काळात मंडळात दररोज सुमारे ८ ते १० मेट्रिक टन अन्न आणि सेंद्रिय कचरा निर्माण होत असतो. हा कचरा उगमस्थानीच विलगीकरण केला जाईल आणि , हा ओला कचरा विशेष वाहनांद्वारे गोळा करुन नायर रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय, जीटीबी रुग्णालय आणि सायन रुग्णालयातील बीएमसीच्या बायोमिथेनेशन प्रकल्पांमध्ये नेला जाणार आहे.

या प्रत्येक प्रकल्पाची प्रक्रिया क्षमता दररोज सुमारे २ मेट्रिक टन इतकी आहे. या उपक्रमांतर्गत ११ दिवसांत सुमारे ८० मेट्रिक टन सेंद्रिय कचऱ्यावर प्रक्रिया करून अंदाजे ७,७४४ युनिट्स अक्षय ऊर्जा निर्माण करण्याचे नियोजन आहे. अर्थात, हे प्रमाण विलगीकृत कचऱ्याचे प्रमाण आणि गुणवत्ता आणि प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कार्यक्षमतेवर अवलंबून असणार आहे.

या प्रकल्पातून निर्माण झालेली वीज रुग्णालयाच्या आवारातील विविध गरजांसाठी, जसे की रुग्ण कक्ष (वॉर्ड्स), कॉरिडॉर आणि सामायिक जागांमधील प्रकाशयोजनेसाठी वापरली जाणार आहे.

हा उपक्रम बीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत हाती घेण्यात आला आहे. एफ/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे नेतृत्व करत आहेत. या प्रकल्पांचे संचलन आणि देखभाल बीएमसीने नियुक्त केलेली संस्था ‘मेसर्स एरोकेअर एव्हिएशन प्रा. लि.करत आहे.

 ‘प्रसाद टू पॉवर’

मोठ्या सार्वजनिक गणेश उत्सवांदरम्यान निर्माण होणाऱ्या सेंद्रिय कचऱ्याचे रुपांतर उपयुक्त संसाधनात कसे करता येते, हे हा प्रकल्प दर्शवतो. त्याचबरोबर, हा प्रकल्प उगमस्थानी कचरा विलगीकरण, शास्त्रीय कचरा प्रक्रिया, अक्षय ऊर्जा आणि ‘सर्क्युलर इकॉनॉमी’ (चक्रीय अर्थव्यवस्था) या तत्त्वांना प्रोत्साहन देतो. ‘प्रसाद टू पॉवर’ द्वारे गणेशोत्सवातील मंडपात तयार होणारा ओला कचरा बीएमसी रुग्णालयांमध्ये प्रकाश पसरवण्यास मदत करणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us