Mumbai Water Supply : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, पाणीपुरवठ्याबाबत महत्वाची अपडेट समोर
Mumbai water supply : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. महापालिका लवकरच पाणीकपात रद्द करण्याची शक्यता आहे.

राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिली होती. त्यानंतर जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात सर्वदूर पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुसळधार पावसामुळे जलाशयांमधील पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. मुंबईल पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे पालिका मुंबईतील पाणीकपात मागे घेण्याची शक्यता आहे. याबाबत मुंबई महापालिका लवकरच निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे.
दहा टक्के पाणी कपात मागे घेण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि तलावांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. तलावांमधील एकूण पाणीसाठा सुमारे ९० टक्क्यांच्या उंबरठ्यावर पोहोचल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता लवकरच लागू असलेली १० टक्के पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय महापालिका घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सात जलाशयातील पाणीसाठा 89 टक्क्यांवर
सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये आवश्यक क्षमतेच्या जवळपास ८९ टक्के पाणीसाठा जमा झालाय. यामध्ये मोडक सागर आणि विहार तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहे. तर तानसा आणि तुळशी तलावही जवळपास तुडुंब भरले आहेत. मुंबईला दररोज सुमारे ४,१०० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी या सात प्रमुख जलाशयातून पुरविले जाते. उन्हाळ्यात महापालिकेने पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी काही काळापूर्वी १० टक्के पाणीकपात लागू केली होती. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांतील जोरदार पावसामुळे दररोजच्या पाणीपुरवठ्यात वाढ देखील करण्यात आली आहे. सात जलाशयांत पाणीसाठा वाढल्याने कपात रद्द होण्याची शक्यता आहे. सध्याचा पाणीसाठा आणि आगामी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाकडून पाणीकपातीचा आढावा घेतला जात आहे. सातही जलाशयातील पाणीसाठा पाहता लवकरत पालिकेकडून पाणीकपात रद्द करण्याची घोषणा केली जाऊ शकते. पाणीकपात रद्द केल्यास मुंबईकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.