AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Election News LIVE : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर दाखल

| Edited By: | Updated on: Dec 30, 2025 | 11:45 PM
Share

BMC, Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates: महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवट दिवस आहे. सोमवारी पक्षांकडून उमेदवारीची पहिली यादी जाहीर करण्यात आली.

Maharashtra Election News LIVE : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर दाखल
live updatesImage Credit source: Tv9

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असताना सर्वच प्रमुख नेत्यांनी आघाडी- युतीसाठी रात्री उशिरापर्यंत चर्चेचं गुऱ्हाळ सुरू ठेवलं. मुंबई महापालिकेसाठी कॅांग्रेस – वंचितची आघाडी वगळता राज्यातील सर्व २९ महापालिकांमध्ये शेवटपर्यंत जागावाटपाचा घोळ सुरु होता. एका जागेसाठी अनेक इच्छुक उमेदवार असल्याने नाराजी दूर करण्यासाठी पक्षाच्या नेत्यांची कसरत सुरू होती. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात रात्री उशिरा जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात आलं. मुंबईत भाजप १३७ तर शिवसेना शिंदे गट ९० जागा लढवणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९५ ते १०० जागांचा आग्रह धरला होता. तर भाजपने १४० जागा लढवण्याचा निश्चय केला होता. भाजप शिवसेनेत जोरदार रस्सीखेच झाल्यानंतर जागावाटपाचं सूत्र अखेर निश्चित करण्यात आलं. यासह राज्यातील, देशविदेशातील इतर अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 30 Dec 2025 05:58 PM (IST)

    कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला राष्ट्रवादीकडून तिकीट

    गुंड गजा मारणेच्या पत्नीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म दिला गेला.त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. इतकंच काय तर आंदेकर टोळीतल्या दोन महिलांनाही राष्ट्रवादीची उमेदवारी दिली आहे.

  • 30 Dec 2025 05:50 PM (IST)

    मीनाक्षी शिंदे यांच्या नाराजीनंतर अखेर विक्रांत वायचळ याला उमेदवारी

    ज्याच्यासाठी शिवसेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिला होता, अखेर त्यालाच तिकीट मिळाले. विक्रांत वायचळ याला पक्षाने निलंबित केले होते, मात्र आज त्यांना तिकीट जाहीर केले गेले.  मीनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेत विक्रांत वायचळ याला प्रभाग क्रमांक 3 मधून तिकीट दिले.

  • 30 Dec 2025 05:41 PM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर दाखल

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट होत आहे. पुढच्या रणनितीसाठी राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेल्याचं सांगितलं जात आहे.

  • 30 Dec 2025 05:28 PM (IST)

    मुंबई प्रभाग 95 मधून ठाकरेंचा माजी नगरसेवक अपक्ष म्हणून रिंगणात

    ठाकरेंच्या शिवसेनेच्या चंद्रशेखर वायंगणकरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. तिकीट वाटपावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि अपक्ष रिंगणात उतरला आहे. मुंबई प्रभाग क्रमांक 95 मध्ये त्यांनी बंडखोरी केली.

  • 30 Dec 2025 05:25 PM (IST)

    महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली

    महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. उद्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी होणार आहे. मनपा निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला निकाल लागणार आहे.

  • 30 Dec 2025 05:05 PM (IST)

    ठाण्यात राम रेपाळे यांनी शिवसेनेकडून अर्ज भरताना केलं शक्तिप्रदर्शन

    ठाणयात शिवसेनेकडून अर्ज भरताना शक्तिप्रदर्शन करण्यात आलं.  शिवसेनेचे सचिव राम रेपाळे यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. प्रभाग क्रमांक 18 मधून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला.  राम रेपाळे यांच्यासोबत माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या सौभाग्यवती जयश्री फाटक यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला. राम रेपाळे, दीपक वेतकर, सुखदा मोरे, जयश्री फाटक, यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एबी फॉर्म घेऊन शक्तिप्रदर्शन केलं.

  • 30 Dec 2025 04:55 PM (IST)

    सांगली – उमेदवारी डावल्याने भाजपच्या इच्छुकांनी धरली शिवसेनेची वाट

    सांगलीमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे, उमेदवारी डावल्यामुळे भाजपाचे माजी उपमहापौरासह भाजप इच्छुकांनी भाजपाला सोडचिट्टी देत शिवसेना शिंदे गटाची वाट धरत शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी दाखल केली आहे. सांगलीच्या प्रभाग 14 मधील भाजपाचे माजी उपमहापौर युवराज बावडेकर यांच्यासह भाजपच्या इच्छुक उमेदवारांना उमेदवारी डावलण्यात आली आहे, त्यामुळे युवराज बावडेकर आणि भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी भाजपला रामराम करत, थेट शिवसेना शिंदे गटातून आपली उमेदवारी दाखल केली आहे.

  • 30 Dec 2025 04:40 PM (IST)

    भाजपकडून आयात नेत्यांना उमेदवारी – सतेज पाटील

    आमदार सतेज पाटील यांनी म्हटले की, ‘भाजप हा आता मूळ पक्ष राहिलेला नाही, ज्या कार्यकर्त्यांनी शहरात भाजप रुजवली त्यांना आता बाहेर ठेवण्यात आले आहे व नव्याने पक्ष्यात प्रवेश केलेल्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभेमध्ये मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री एकत्र बसतात पण निवडणुकीमध्ये स्वतंत्रपणे लढतात हे संपूर्ण जनता आता पाहत आहे. त्यामुळे इचलकरंजी महापालिकेमध्ये व कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीचे महापौर, नगरसेवक निवडून येतील.

  • 30 Dec 2025 04:27 PM (IST)

    जालना महानगरपालिका निवडणुकीत युती तुटली – आमदार लोणीकर

    जालना महानगर पालिकेत भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी दिलीय. भाजप आणि शिवसेनेच्या काही जागेवर वाद, त्यामुळे अखेर युती तुटली आहे. आता महायुती मधील सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत. भाजप 64 जागेवर निवडणूक लढणार आहेत, आणि आठवले गट एका जागेवर निवडणूक लढणार आहे असे लोणीकर यांनी म्हटल आहे.

  • 30 Dec 2025 04:15 PM (IST)

    सोलापूर : अर्ज स्वीकृती केंद्रावर भाजप विरोधात सर्वपक्षीय नेत्यांचा ठिय्या

    सोलापूरात अर्ज स्वीकृती केंद्रावर भाजप विरोधात सर्वपक्षीय नेत्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. वेळ संपल्यानंतर भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी आल्याने त्यांना काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाने आत जाण्यासाठी रोखले होते. मात्र भाजपच्या मते आम्ही AB फॉर्म यापूर्वीच दिलेत केवळ पोहोच घेण्यासाठी आम्ही आलो होतो असं म्हटलं आहे. मात्र शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट, काँग्रेस पक्षाने यावर आक्षेप घेतला. AB फॉर्म आत गेले नसल्याचा दावा काँग्रेस, शिवसेना पक्षांनी केला आहे.

  • 30 Dec 2025 04:03 PM (IST)

    आरपीआयचे कार्यकर्ते आक्रमक, भाजपाच्या प्रचार कार्यालयाचे बॅनर फाडले

    छत्रपती संभाजीनगरमध्ये आरपीआयचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या प्रचार कार्यालयाचे बॅनर फाडले आहेत. भाजपा आरपीआय आठवले गटाला उमेदवारी न दिल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. तर फाडलेले पोस्टर पुन्हा आरपीआयच्या कार्यकर्त्याकडून ताराने बांधण्याचे काम सुरू आहे.

  • 30 Dec 2025 03:16 PM (IST)

    मुंबईच्या भायखळ्यातील दारुखाना परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट

    मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईच्या भायखळ्यातील दारुखाना परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे.दरम्यान या आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.

  • 30 Dec 2025 03:07 PM (IST)

    नांदेडमध्ये महायुतीत बिघाडी, तिन्ही मित्रपक्षांनी दाखल केले उमेदवारी अर्ज

    नांदेडमध्ये महायुतीत बिघाडी झाल्याचं स्पष्ट झालंय. महायुतीतील तिन्ही मित्रपक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजप, दादांची राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेना हे तिन्ही पक्ष स्वतंत्ररित्या नांदेड महानगरपालिका लढवणार आहेत. तर नांदेड महानगरपालिकेसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली आहे.

  • 30 Dec 2025 03:00 PM (IST)

    आयुष्य कोमकरची आई निवडणुकीच्या रिंगणात! भरला उमेदवारी अर्ज

    आयुष्य कोमकरची आई कल्याणी कोमकर या देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना AB फॉर्म देण्यात आला आहे.

  • 30 Dec 2025 02:45 PM (IST)

    अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अखेर आंदेकरांच्या कुटुंबाला उमेदवारी

    पुण्यातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अखेर आंदेकरांच्या कुटुंबाला उमेदवारी देण्यात आली आहे. लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना अजित पवारांच्या पक्षाकडून देण्यात आला AB फॉर्म. आंदेकर यांच्या वकिलांच्या मार्फत भरण्यात आले AB फॉर्म. पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

  • 30 Dec 2025 02:30 PM (IST)

    उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही मिनिटे बाकी असताना तुफान गर्दी

    उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघा काही मिनिटांचा कालावधी बाकी आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालया बाहेर अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची मोठी लगबग सुरू आहे. कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे.

  • 30 Dec 2025 02:15 PM (IST)

    पुण्यात पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात

    पुण्यात पती पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आमदार बापू पठारे यांचे सुपुत्र आणि सून निवडणुकीच्या रींगणात आहेत. सुरेंद्र पठारे आणि ऐश्वर्या पठारे यांनी भरला उमेदवारीचा अर्ज भरला आहे. सुरेंद्र पठारे प्रभाग क्रमांक 4 तर ऐश्वर्या पठारे प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणूक लढणार आहेत.

  • 30 Dec 2025 01:58 PM (IST)

    किशोर जोरगेवार यांचा आक्षेप अजूनही कायम

    चंद्रपूरमध्ये अजय सरकार आणि पूजा पोतराजे यांच्या नावावर किशोर जोरगेवार यांचा आक्षेप अजूनही कायम आहे.जोरगेवार यांच्या आक्षेपामुळे एबी फॉर्म वाटण्याची प्रक्रिया अजूनही थांबलेली, हॉटेलमध्ये भाजपचे इच्छुक उमेदवारांचे कार्यकर्ते ताटकळत उभे आहेत. ज्या उमेदवारांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे त्यांना झोन कार्यालयात इतर कागदांसह रवाना करण्यात आलं.मात्र एबी फॉर्म अजूनही थांबविण्यात आले आहेत, अजय सरकार आणि पूजा पोतराजे यांची उमेदवारी रद्द करण्यासाठी जोरगेवार यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे.निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेती आणि निवडणूक प्रभारी अशोक नेते यांच्यासोबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा देखील सुरू आहे

  • 30 Dec 2025 01:45 PM (IST)

    अभिषेक पाटलांचा तडकाफडकी राजीनामा

    जळगावात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटलांचा तडकाफडकी राजीनामा दिला. अभिषेक पाटलांच्या आई तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला पदाधिकारी कल्पनाबाई पाटील यांची पदाधिकाऱ्यांकडून समजूत काढण्यात येत आहे. हॉटेल रॉयल पॅलेस येथे कल्पना पाटील यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेण्यासाठी बोलावले. जिल्हाध्यक्ष संजय पवार, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार मनीष जैन यांच्याकडून समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.काही नाराजी असेल ती दूर होईल, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी माहिती दिली.

  • 30 Dec 2025 01:36 PM (IST)

    कुठेही महायुती तुटलेली नाही-उदय सामंत

    पुण्यात भाजपाने आणि शिवसेनेने विचारपूर्वक ab फॉर्म दिले आहेत. मी स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बोललो आहे. कुठेही महायुती तुटलेली नाही असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.

  • 30 Dec 2025 01:26 PM (IST)

    जळगाव महापालिका निवडणुकीत महायुती, जागांचा फॉर्म्युला ठरला

    जळगाव महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट 23, भाजप 47 आणि राष्ट्रवादी अजित गट 6 जागा लढणार आहेत. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे यांचा महायुती झाल्याबद्दल दुजोरा दिला.महायुती झाल्याच्या घोषणेची औपचारिकता बाकी आहे. दोन वाजता पत्रकार परिषद घेऊन महायुती संदर्भात घोषणा होण्याची माहिती समोर येत आहे.

  • 30 Dec 2025 01:13 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरात मोठा ड्रामा

    भाजप कार्यकर्ते संतप्त झाले. तिकीट नाकारल्याने पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झाले. हिंदू मतदारसंघ हिंदू लोक आणि तुम्ही अशा लोकांना हे करताय काय असा सवाल त्यांनी केला. आमच्यावर कोर्टाच्या केस आहेत. केसेस अंगावर घ्या. काल आलेल्यांना काही लोकांनी पैसे घेऊन तिकीट दिली. त्याचा मी निषेध करते. मी अपक्ष फॉर्म भरला आहे असे महिलांनी सांगितले.

  • 30 Dec 2025 01:01 PM (IST)

    काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप

    उद्योगपती अदानी यांच्या मध्यस्थीने शरद पवार NDA मध्ये सामील होण्याची शक्यता आहे.मोदींनाही लोकसभेत खासदारांची गरज आहे. शरद पवार यांच्याकडेही आमदार कमी आहेत.पुण्यात दोन्ही गट एकत्र आल्याने एकत्रीकरणाची पहिली पायरी गाठल्याचे स्पष्ट झाले असून पुण्यातील ही युती स्थानिक स्तरावरची तात्पुरती युती ठरते का याकडे सर्वांचे लक्ष आहे.असा मोठा खुलासा राज्यातील मनपा निवडणुकीच्या धुरळ्यात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय.

  • 30 Dec 2025 12:45 PM (IST)

    नाशिक – कारागृहातील भाजपचे माजी नगरसेवकाच्या मुलाला भाजपकडून उमेदवारी

    नाशिक – कारागृहात असलेले भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचे पुत्र रिद्धीश निमसे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.  भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव निमसे हे धोत्रे खून प्रकरणात कारागृहात आहेत . उद्धव निमसे कारागृहात असताना उद्धव निमसे यांच्या मुलाला प्रभागातील पक्षीय बलाबल व राजकीय ताकद बघता भाजपकडून उमेदवारी देण्यात आली.

  • 30 Dec 2025 12:35 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्ते संतप्त

    छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्ते संतापले आहेत. उमेदवारी न मिळाल्याने अनेक जण नाराज झाले आहेत. भाजपमध्ये निष्ठावंतांना डावललं गेल्याची भावना अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

  • 30 Dec 2025 12:24 PM (IST)

    भांडूपमध्ये मनसेची पहिली बंडखोरी

    भांडूपमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पहिली बंडखोरी झाल्याचं समोर आलं आहे. अनिशा माजगांवकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. वॉर्ड 114 मधून माजगवाकर यांनी अर्ज दाखल केला आहे.  जागावाटपात वॉर्ड क्रमांक 114 हा ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला आला असून राजोल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

  • 30 Dec 2025 12:12 PM (IST)

    मविआत बेबनाव , तर महायुती मजबूत आहे – आशिष शेलार

    आमच्याकडे मजबूत उमेदवारांची रीघ लागली आहे . मुंबईत महायुती 150 हून अधिक जागा जिंकेल , महायुती मजबूत आहे – असं आशिष शेलार म्हणाले.

  • 30 Dec 2025 12:05 PM (IST)

    भाजप मधून उमेदवारी न मिळाल्याने नाराज कार्यकर्त्याचा अजित पवार गटात प्रवेश

    नागपूर – भाजप मधून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले भाजपचे राजू नगुलवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करत एबी फार्म घेतला.  आता ते  प्रभाग 32 मधून राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर चारच्या पॅनल सह निवडणूक लढवणार आहेत.  राजू नगुलवार हे आधी राष्ट्रवादी मध्ये होते मात्र त्यांनी भाजप आमदार मोहन मते यांच्यावर विश्वास ठेवत 2020 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता .

  • 30 Dec 2025 11:58 AM (IST)

    भाजपामधील नाराज शिंदेंच्या शिवसेनेचा वाटेवर…

    पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेने युती तुटल्याचा जाहीर केल्यानंतर भारतीय जनता पार्टीतील नाराज उमेदवार शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. भारतीय जनता पार्टीत अनेक जण उमेदवारी न मिळाल्याने नाराज आहेत. नाराज असलेल्यांना शिंदेंच्या शिवसेनेचा पर्याय दिसत आहे.

  • 30 Dec 2025 11:40 AM (IST)

    महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटला

    काँग्रेस 30 ठाकरे गट 30 राष्ट्रवादी शरद पवार गट 14 जागा…सेनेचा कोट्यातून मनसेला जागा मिळणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे एबी फॉर्म द्यायला सुरुवात झाली आहे.. भारतीय जनता पार्टी तर्फे उमेदवारी डावलण्यात आल्याने निष्ठावंतांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून एबी फॉर्म घेतले..

  • 30 Dec 2025 11:25 AM (IST)

    अमरावतीत शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढवणार

    अमरावतीत शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढवणार आहे.  सर्व 87 जागेसाठी एबी फॉर्म वाटप करणे सुरू झालं आहे. एबी फॉर्म घेण्यासाठी इच्छुकांची गर्दी जमली आहे. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये सन्मानजगक जागा न मिळाल्याने शिवसेना शिंदे गट महायुती मधून बाहेर पडला आहे. आता संपूर्ण 87 जागा शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढत आहे.. त्यासाठी माजी आमदार शिवसेना नेते अभिजीत अडसूळ हे उमेदवारांना एबी फॉर्म वाटप करत आहे… त्यासाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली आहे,

  • 30 Dec 2025 11:07 AM (IST)

    भाजपच्या वतीने महानगरपालिकेसाठी ठरवली जात आहे राजकीय रणनीती

    संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर भाजपाची महत्त्वाची बैठक सुरू आहे.  मंत्री अतुल सावे यांच्या निवासस्थानी अतुल सावे व भागवत कराड, संजय केनेकर व किशोर शितोळे यांच्यात बैठक सुरू आहे. बैठकीत भाजपच्या वतीने महानगरपालिकेसाठी राजकीय रणनीती ठरवली जात आहे.

  • 30 Dec 2025 10:57 AM (IST)

    चंद्रपुरात महाविकास आघाडीला खिंडार, काँग्रेस-राष्ट्रवादीची युती फिस्कटली

    चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीतील बिघाडी अखेर समोर आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात युतीसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली बोलणी अखेर फिस्कटली आहेत. जागावाटपाचा तिढा न सुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आता स्वबळाचा नारा दिला असून पक्षाकडून ५५ जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे, काँग्रेसची आरपीआय (खोरिपा) सोबतची युतीची शक्यताही मावळल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आता एकला चलो रे ची भूमिका घेत महानगरपालिकेच्या सर्व ६६ जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे चंद्रपुरात आता बहुरंगी लढत पाहायला मिळणार असून काँग्रेसच्या या निर्णयामुळे राजकीय गणिते बदलली आहेत.

  • 30 Dec 2025 10:47 AM (IST)

    नांदेडच्या लोह्यात भीषण आग, शॉर्टसर्किटमुळे ७ दुकाने खाक; कोट्यवधींचे नुकसान

    नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली असून, यामध्ये सात दुकाने जळून खाक झाली आहेत. या दुर्घटनेत दुकानांमधील सामानाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे, मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

  • 30 Dec 2025 10:37 AM (IST)

    उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज शेवटची संधी, किती वाजेपर्यंत करता येणार अर्ज

    महाराष्ट्र राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज (३० डिसेंबर) शेवटचा दिवस आहे. सकाळपासूनच सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये इच्छुकांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र, उमेदवारांनी वेळेचे बंधन पाळणे अत्यंत आवश्यक आहे. नियमानुसार, मुंबई महानगरपालिकेसाठी (BMC) अर्ज स्वीकारण्याची मुदत दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. तर, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि छत्रपती संभाजीनगरसह इतर सर्व महानगरपालिकांसाठी अर्ज भरण्याची वेळ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत देण्यात आली आहे. ऐनवेळी होणारी तांत्रिक अडचण किंवा गर्दी टाळण्यासाठी उमेदवारांना वेळेत पोहोचण्याचे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.

  • 30 Dec 2025 10:27 AM (IST)

    पुण्यात मध्यरात्री राजकीय भूकंप, एबी फॉर्म परत मागवले

    पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात शिवसेनेमध्ये मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले. काल दिवसभरात पुण्यातील ६० हून अधिक इच्छुकांना शिवसेनेकडून एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले होते, ज्यामुळे सेना स्वबळावर लढणार अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, रात्री उशिरा मुंबईतून वरिष्ठांचा युतीचा निरोप आल्याने हे सर्व फॉर्म्स तातडीने माघारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे आता पुणे महापालिकेत शिवसेना आणि भाजप पुन्हा युती करूनच रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • 30 Dec 2025 10:17 AM (IST)

    अजित पवार निवडणूक लढवणार, पिंपरी-चिंचवडमधून भरला उमेदवारी अर्ज

    पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवार निवडणूक लढवणार असल्याचे समोर आल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, हे उपमुख्यमंत्री अजित पवार नसून प्रभाग क्रमांक २५ (ड) मधून अजित पोपट पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर हा अर्ज भरला असून, त्यांना पक्षाचा अधिकृत ‘एबी फॉर्म’ मिळाल्यास ते महायुतीचे अधिकृत उमेदवार असू शकतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार आणि उमेदवार अजित पवार यांच्या नावातील साधर्म्यामुळे सध्या संपूर्ण शहरात अजित पवार पिंपरीची निवडणूक लढणार अशी जोरदार चर्चा रंगली आहे.

  • 30 Dec 2025 10:07 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेत बंडाचे वारे, माजी महापौर विकास जैन यांची निवडणुकीतून माघार

    छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवसेनेत सध्या अंतर्गत राजकीय नाट्य आणि नाराजीचा मोठा उद्रेक पाहायला मिळत आहे. काल शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी आपल्या समर्थकांसह संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर भेट दिल्यानंतर पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या घडामोडींमुळे व्यथित होऊन माजी महापौर विकास जैन यांनी आगामी निवडणूक न लढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सध्या पक्षात शिस्त राहिलेली नाही. ही सुरू असलेली पद्धत आपल्याला मान्य नसल्याची तीव्र भावना जैन यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

  • 30 Dec 2025 09:55 AM (IST)

    मंत्री उदय सामंत काही वेळात बैठकीच्या ठिकाणी पोहचणार

    मंत्री उदय सामंत काही वेळात बैठकीच्या ठिकाणी पोहचणार. मंत्री उदय सामंत येण्यापूर्वी शिवसैनिकांनी केली मोठी गर्दी.. पुण्यातील हॉटेलमध्ये पार पडणार शिवसेनेची बैठक… बैठकीला शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे आले आहेत..

  • 30 Dec 2025 09:50 AM (IST)

    धुळे महानगरपालिकेत 75 जणांनी दाखल केले अर्ज दाखल

    1992 अर्जाची झाली विक्री.. भाजपातर्फे चार जणांनी दाखल केले अर्ज. या दोन माजी नगरसेवकांचा समावेश.अद्यापही भाजपा तर्फे अंतिम यादी जाहीर न झाल्याने संभ्रम. अनेक आजी-माजी नगरसेवक आणि माजी महापौरांचा पत्ता कट. शेवटच्या क्षणाला काही उमेदवारांना भाजप एबी फॉर्म देऊन उमेदवारी देण्याच्या तयारी..

  • 30 Dec 2025 09:40 AM (IST)

    नांदेडमध्ये शिवसेना – भाजपा युतीची आशा मावळली, भाजपाचा स्वबळाचा नारा

    शिंदे शिवसेना व दादाची राष्ट्रवादी नांदेड महानगरपालिकेसाठी दहा प्रभाग एकत्र लढण्याची तयारी. युतीवरून शिंदे गटात फूट, दोन आमदार राष्ट्रवादी सोबत तर एक आमदार स्वतंत्र उमेदवार देणार. दादाच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील व आमदार आनंद पाटील बोंढारकर यांचे मनोमिलन तर शिंदे गटाचे नांदेड उत्तरचे मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर दहा प्रभागात स्वतंत्र उमेदवार देणार असल्याची माहिती

  • 30 Dec 2025 09:30 AM (IST)

    आजपासून त्रंबकेश्वर मंदिर पहाटे चार वाजेपासून राहणार खुले

    04 जानेवारी पर्यंत मंदिराच्या वेळेत बदल. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखो भाविक त्रंबकेश्वर मध्ये दाखल. भाविकांची गर्दी लक्षात घेता त्र्यंबकेश्वर देवस्थानचा निर्णय. नाताळ व नवीन वर्षाच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर निर्णय. विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांची माहिती

  • 30 Dec 2025 09:20 AM (IST)

    शरद पवारांचे राष्ट्रवादी 40 प्रभागात प्रत्येकी एक उमेदवार देणार

    दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असल्याने अजित पवारांची राष्ट्रवादी 125 शरद पवारांची 40 जागा लढणार. पॅनल निवडून येण्यास सोपे जाण्यासाठी अजित पवारांचे तीन उमेदवार आणि राष्ट्रवादी शरद पवारांचा एक उमेदवार प्रत्येक प्रभागात असणार. राजकीय अस्तितव टिकवण्यासाठी प्रत्येक प्रभागात आपला अस्तित्व टिकवण्यासाठी शरद पवारांचे राष्ट्रवादीची रणनीती..

  • 30 Dec 2025 09:10 AM (IST)

    भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती साठी सुरू असलेली बोलणी फिस्कटली…

    चंद्रपूर महानगरपालिकेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती साठी सुरू असलेली बोलणी फिस्कटली.  राष्ट्रवादी काँग्रेस 40 जागांवर देणार उमेदवार तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील युती निश्चित, भाजप चंद्रपूर महानगरपालिकेत 66 पैकी 58 जागांवर निवडणूक लढणार तर शिवसेना शिंदे गटाला मिळाल्या 8 जागा, मात्र भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर न करता उमेदवारांना झोन कार्यालयात निवडणूक अर्ज भरण्यासाठी बोलवणार आणि त्याच ठिकाणी एबी फॉर्म मंडळ अध्यक्ष नेऊन देणार

  • 30 Dec 2025 09:00 AM (IST)

    पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला मोठा निर्णय

    पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला. कलम 17 कायमचं रद्द करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी कलम 17 नुसार, वांगणी-शेलु इथं सरकारने दिलेली घरं जर कामगाराने नाकारली, तर त्याला पुढे कधीही घर मिळण्याचा हक्क संपायचा. आता हा नियम पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. यामुळे कामगारांना आवडेल ती जागा निवडण्याची आणि घर मिळवण्याची संधी कायम राहील.

    सुधारित शासन निर्णय मुंबईतील लाखो गिरणी कामगारांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आता कामगारांना मुंबई शहरातच हक्काची घरे मिळतील. मुंबईत गिरणी कामगारांची मते निर्णायक आहेत.

  • 30 Dec 2025 08:55 AM (IST)

    डोंबिवलीत निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठा बदल

    डोंबिवलीत निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. फडके रोड ,एच प्रभाग आणि पूर्वेतील जी आणि एफ प्रभागसह निवडणूक कार्यालयांजवळील रस्ते सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत बंद राहतील. केडीएमसी निवडणूक पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील प्रभाग कार्यालयांजवळ वाहतुकीवर निर्बंध आहे. आज सकाळी ९ ते दुपारी ४ वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

    डोंबिवली पश्चिमेतील एच प्रभाग आणि पूर्वेतील जी आणि एफ प्रभाग कार्यालय परिसर प्रभावित आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला. ठाकुर्ली–फडके रोड–गणेश मंदिर मार्गावर काही प्रवेश पूर्णपणे बंद तर पी. पी. चेंबर्स, सुनीलनगर, उमेशनगर परिसरात प्रवेशबंदी आणि पर्यायी रस्ते सुरू राहणार आहेत. विशेष म्हणजे काही ठिकाणी 31 डिसेंबर रात्री १० वाजेपर्यंत वाहतूक बदल लागू राहणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

  • 30 Dec 2025 08:44 AM (IST)

    पुणे- दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार

    पुणे- दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष 125 जागांवर तर 40 जागांवर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष लढणार आहे. जिजाई बंगल्यावरती उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरू आहे.

  • 30 Dec 2025 08:34 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर विकास जैन नाराज

    छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर विकास जैन नाराज असल्याची माहिती आहे. निवडणूक लढवणार नसल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. एकूणच घडत असलेल्या शिवसेना पक्षातील घडामोडीवर नाराज असल्याचं कळतंय. विकास जैन 2001-2002 मध्ये शिवसेनेचे महापौर होते. काल जागा वाटपावरून संजय शिरसाट यांच्यावर शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी व्यक्त नाराजी केली होती.

  • 30 Dec 2025 08:25 AM (IST)

    मुंबईत आज हवेचा गुणवत्ता निर्देशांक १२९ वर

    देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत आज हवेचा गुणवत्ता निर्देशांक १२९ वर आहे. घाटकोपर आणि वांद्रे इथे एक्युआय १५७ पर्यंत पोहोचलाय. त्यासोबतच बोरीवली, चकाला , चेंबूर, देवनार, मालाड, दादार आणि कुलाबा यांसारख्या ठिकाणी प्रदूषण जास्त आहे. लहान मुले आणि वयोवृद्धांना याचा फटका बसतोय.

  • 30 Dec 2025 08:24 AM (IST)

    मलकापूरचे काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त नगराध्यक्ष अतीक जवारीवाला यांच्यावर गुन्हा दाखल

    मलकापूरचे काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त नगराध्यक्ष अतीक जवारीवाला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर काढण्यात आलेल्या जल्लोष रॅलीत नोटा उधळल्याने अतिक जवारीवाला यांच्यावर निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

  • 30 Dec 2025 08:20 AM (IST)

    मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का

    मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना विभाग क्रमांक 2 चे विभागप्रमुख लालसिंह राजपुरोहित यांनी शिवसेनेतून राजीनामा दिला. शिवसेना विभागप्रमुख लालसिंग राजपुरोहित यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. लालसिंह राजपुरोहित यांनी त्यांची पत्नी भाग्यलक्ष्मी यांना वॉर्ड क्रमांक 31 मधून काँग्रेसची उमेदवारी दिली. लालसिंह राजपुरोहित हे शिवसेनेचे विभागप्रमुख होते, पण मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ते काँग्रेसमध्ये सामील झाले.

Published On - Dec 30,2025 8:18 AM

Follow us
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.
काळजी फक्त रोहित पवारांनाच आहे असं नाही; प्रवीण दरेकरांचं मोठं विधान
काळजी फक्त रोहित पवारांनाच आहे असं नाही; प्रवीण दरेकरांचं मोठं विधान.