
देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या (BMC) सत्तेचा पेच आता एका रंजक वळणावर येऊन ठेपला आहे. मुंबई महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवाची इच्छा असेल तर महापौर आपलाच होईल, असे विधान केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. हे विधान केवळ कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी वाटत असले, तरी त्यामागे मुंबईच्या भौगोलिक राजकारणाचे आणि आरक्षणाचे एक छुपे गणित दडलेले आहे.
मुंबईत एकूण २२७ जागा आहेत. महापालिकेतील सत्तेसाठी ११४ हा जादुई आकडा गाठणे आवश्यक आहे. सध्याचे चित्र पाहिल्यास महायुती (भाजप + शिंदे शिवसेना) कडे ११८ नगरसेवक आहेत. तर उद्धव ठाकरे गट + मनसे यांच्याकडे ७१ नगरसेवक आहेत. कायदेशीररीत्या महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे. मात्र, महापौर निवडीची प्रक्रिया केवळ आकड्यांवर नाही, तर आरक्षणाच्या सोडतीवर अवलंबून असते. या आरक्षणाच्या चक्रातच महायुतीची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई महापौरपदाचे आरक्षण रोटेशन पद्धतीने ठरते. येत्या गुरुवारी २२ जानेवारी रोजी ही सोडत निघणार आहे. जर ही सोडत अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी निघाली, तर महायुतीचे संख्याबळ असूनही त्यांना मोठा धक्का बसू शकतो. त्यामागे काही कारणेही आहेत.
संपूर्ण मुंबईत २२७ वॉर्डांपैकी केवळ दोनच जागा एसटी प्रवर्गासाठी आरक्षित होत्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या दोन्ही जागांवर वॉर्ड क्र. ५३ आणि वॉर्ड क्र. १२१ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. सद्यस्थितीत भाजप किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे एसटी प्रवर्गातील एकही निवडून आलेला नगरसेवक नाही. त्यासोबतच नियमानुसार महापौरपदासाठी ज्या प्रवर्गाचे आरक्षण निघते, त्याच प्रवर्गातील निवडून आलेला नगरसेवक उमेदवार म्हणून उभा राहू शकतो.
जर आरक्षण एसटी प्रवर्गासाठी निघाले, तर मैदानात फक्त उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जितेंद्र वळवी आणि प्रियदर्शिनी ठाकरे हे दोन उमेदवार रिंगणात असतील. अशा वेळी महायुतीकडे दोनच पर्याय उरतात. यातील पहिला पर्याय म्हणजे ठाकरेंच्या या दोन नगरसेवकांपैकी कोणा एकाला फोडून आपल्या पक्षात घेणे. मात्र, यासाठी कडक पक्षांतर बंदी कायद्याला सामोरे जावे लागेल. नाहीतर दुसरा पर्याय म्हणजे तांत्रिकदृष्ट्या उमेदवार नसल्यामुळे महापौरपद ठाकरेंच्या शिवसेनेला बहाल करणे. याच तांत्रिक शक्यतांमुळे उद्धव ठाकरे यांनी देवाच्या इच्छेचा उल्लेख केल्याचे बोललं जात आहे.
जर नशिबाने लॉटरीने एसटी आरक्षण दिले, तर अल्पमतात असूनही ठाकरेंचा महापौर महापालिकेत विराजमान होऊ शकतो. या संपूर्ण खेळात काँग्रेसनेही उडी घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे की, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रसंगी आम्ही उद्धव ठाकरेंच्या महापौराला पाठिंबा देऊ. तर दुसरीकडे, भाजपने याला दिवास्वप्न म्हटले आहे. मुंबईचा महापौर महायुतीचाच होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा आरक्षण सोडतीकडे लागल्या आहेत.