मोठी बातमी! संजय राऊत यांच्या घरी बॉम्बशोधक पथक दाखल, पोलिसांचाही ताफा पोहोचला

ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या घरी बॉम्बनाशक पथक दाखल झाले आहे. सोबतच मुंबई पोलीसही राऊतांच्या घरी पोहोचले आहेत.

मोठी बातमी! संजय राऊत यांच्या घरी बॉम्बशोधक पथक दाखल, पोलिसांचाही ताफा पोहोचला
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 31, 2025 | 5:45 PM

Sanjay Raut : सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकीचे वातावरण आहे. सगळीकडे प्रचाराला वेग आला आहे. राजधानी मुंबईच्या महानगरपालिकेत विजय मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोर लावत आहेत. प्रचार, डावपेच, आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून चांगलेच सक्रीय झाले आहेत. ठाकरे गट आणि मनसेत युती घडवून आणण्यात संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या दोन्ही पक्षांच्या युतीच्या घोषणेमुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मध्ये संजय राऊत बसलेले दिसून आले. असे असतानाच आता विरोधकांच्या टीकेला छातीवर झेलून जशास तसा हल्लाबोल करणाऱ्या संजय राऊत यांच्या घरी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक दाखल झाले आहे. विशेष म्हणजे संजय राऊतांच्या घरी मुंबई पोलीसही पोहोचले आहेत. क्षणात मोठ्या घडामोडी घडल्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार संजय राऊत यांच्या घरी बॉम्बशोधक पथक दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांचेही एक पथक तिथे पोहचले आहे. संजय राऊत यांच्या घरापुढे ‘बॉम्ब से उडा दुंगा’ असे स्टिकर लावलेली गाडी आढळून आली आहे. त्यामुळेच राऊत यांच्या घरी बॉम्बशोधक पथक दाखल झाले आहे. संजय राऊत यांचे घर हे भांडूपमध्ये आहेत. कारवर लावलेले स्टिकर दिसताच राऊत यांच्या निवासस्थानातील काही कर्मचारी आणि कुटुंबातील सदस्यांनी संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना सांगितलं. नंतर ही माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली. ही माहिती मिळताच मुंबई पोलीस राऊतांच्या घरी दाखल झाले आहेत. राऊतांच्या घराच्या परिसराची आता कसून तपासणी करण्यात येत आहे. घराच्या आसपास तपासणी केली जात आहे. हे स्टिकर नेमके कोणी चिटकवले हे अद्याप समजलेले नाही. परंतु खबरदारी म्हणून राऊतांच्या घराची तसेच आसपासच्या परिसराची तपासणी केली जात आहे.

पोलिसांनी तपासणी चालू केली

संजय राऊत नेहमी पत्रकार परिषद घेत असतात. सध्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. असे असतानाच आता राऊतांच्या घराबाहेर बॉम्बने उडवून देण्याचे स्टिकर लावलेले आढळून आले आहे. त्यामुळे आता या स्टिकरमागे नेमका काही उद्देश लपलेला आहे का? याची तपासणी केली जात आहे.