
मोठी बातमी समोर येत आहे, कल्याणमध्ये मोठी दुर्घटना घटना घडली आहे, इमारतीचा स्लॅब कोसळला, या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर काही जण ढिगाऱ्या खाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये तीन महिलांसह एका दीड वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. श्री सप्तश्रृंगी असं स्लॅब कोसळलेल्या या इमारतीचं नाव आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कल्याणमधील श्री सप्तश्रृंगी इमारतीमध्ये स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर काही जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मृतांमध्ये तीन महिलांसह एका दीड वर्षांच्या चिमुकलीचा सावेश आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पालिका अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गेल्या तीन तासांपासून या ठिकाणी बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत आठ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे. त्यातील चार जणांचा मृत्यू झाला असून, चार जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अजूनही काही लोक ढिगाराखाली अडकल्याची शक्यता असल्यानं रेस्क्यू ऑपरेशन सुरुच आहे.
बाहेर गेला आणि जीव वाचला, मित्र अडकला
दरम्यान ही दुर्घटना जेव्हा घडली तेव्हा त्याच इमारतीमध्ये जितेंद्र गुप्ता आणि व्यंकट चव्हाण हे चौथ्या मजल्यावर कोबा करण्याचं काम करत होते. जितेंद्र हे दुपारी जेवण्यासाठी बाहेर गेले, याचदरम्यान हा स्लॅब कोसळला. जितेंद्र हे जेवणासाठी बाहेर गेल्यानं त्यांचा जीव वाचला आहे. मात्र त्यांचे मित्र व्यंकट हे मलब्याखाली अडकले आहेत. गेल्या दोन तासांपासून या ठिकाणी रेस्क्यू सुरू असून आतापर्यंत आठ जणांना बाहेर काढण्यात आलं आहे, त्यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर चार जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अजूनही तीन ते चार जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. मलब्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं जात आहे.
मृतांची नावं
प्रमिला साहू 58 , नामस्वी शेलार 1.5, सुनीता साहू 37 , सुजाता पाडी 32, सुशीला गुजर 78, व्यंकट चव्हाण 42
जखमींची नावं
अरुणा रोहिदास गिरणारायन 48, शरवील श्रीकांत शेलार 04, विनायक मनोज पाधी 4.5, यश क्षीरसागर 13, निखिल खरात 27, श्रद्धा साहू 14