VIDEO | लॉकडाऊन तोडणाऱ्यांसाठी नेत्यांचा फोन, बुलडाण्याच्या ठाणेदाराची सटकली

| Updated on: Apr 19, 2021 | 11:27 AM

संचारबंदीचे नियम मोडणाऱ्यांना आता बुलडाण्यातील साखरखेर्डा पोलीस आपला खाक्या दाखवणार आहेत. (Buldana Police slams Politicians)

VIDEO | लॉकडाऊन तोडणाऱ्यांसाठी नेत्यांचा फोन, बुलडाण्याच्या ठाणेदाराची सटकली
बुलडाण्यातील पोलीस ठाणेदाराकडून राजकारण्यांची खरडपट्टी
Follow us on

बुलडाणा : ‘आता माझी सटकली’ असं म्हणत बुलडाण्यातील साखरखेर्डा पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. टाळेबंदीचे नियम पायदळी तुडवणाऱ्यांना पोलिसी हिसका दाखवण्याचा इशारा ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी दिला आहे. पोलीस कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्या राजकारण्यांचीही ठाणेदाराने खरडपट्टी काढली. याचा व्हिडीओ समोर आला आहे. (Buldana Police slams Politicians supporting curfew rule breakers)

कोरोनाची दुसरी लाट सर्वत्र पसरत असून अख्खा महाराष्ट्र कवेत घेत आहे. यापासून बचावासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. परंतु संचारबंदीचे उल्लंघन करत काही नागरिक विनाकारण भटकत आहेत. अशा टवाळखोरांना आता साखरखेर्डा पोलीस आपला खाक्या दाखवणार आहेत.

काय म्हणतात ठाणेदार?

आरोग्य कर्मचारी आणि महाराष्ट्र पोलीस अहोरात्र जीवाची बाजी लावून कोरोनाशी लढत आहेत. खरं तर कोरोनाच्या या लढ्यात समाजातील प्रत्येक घटकाने जनजागृती करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. हे सगळं तुमच्यासाठी चाललं आहे. मला इथे जमीनजुमला घेऊन राहायचं नाही. असं असताना पोलीस तुमच्या भल्यासाठी काम करत आहेत. मात्र उलटपक्षी टाळेबंदीचे नियम धाब्यावर ठेवणाऱ्या भामट्यांना काही राजकीय पुढारी पाठीशी घालत कारवाई न करण्याच्या विनंत्या करत आहेत. अशा राजकारण्यांची आता अजिबात गय केली जाणार नाही, असा तंबी वजा इशारा ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी दिला.

पोलीस-नागरिकांची बैठक

बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा पोलीस ठाण्यात व्यापारी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांची एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत परिसरातील जिल्हा परिषद सदस्य, वैद्यकीय अधिकारी, सभापती, व्यापारी यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. दररोज गावात नागरिकांना आपल्या विनयशील स्वभावातून नियम पाळण्याच्या सूचना ठाणेदार जितेंद्र आडोळे करतात.

शिंगणेंच्या मतदारसंघातील गाव

सध्या साखरखेर्डा परिसरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मतदारसंघातील साखरखेर्डा हे महत्त्वाचे गाव आहे. तरीदेखील पोलीस वगळता प्रशासकीय यंत्रणा ढिम्म आहे. मात्र लोक ऐकतच नसल्याचे पाहून ठाणेदार अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. संतापलेल्या ठाणेदार महोदयांनी पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या आणि संचारबंदीचे नियम पायदळी तुडवणाऱ्या व्यापाऱ्यांना खडसावलं. सोबतच व्यापाऱ्यांना पाठिशी घालणाऱ्या राजकारण्यांचाही चांगलाच समाचार घेतला.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

पगार न मिळाल्याने सटकली; ड्रायव्हरने एकापाठोपाठ पाच लक्झरी बसेस पेटवल्या

(Buldana Police slams Politicians supporting curfew rule breakers)