
आज संपूर्ण देशभरात होळीची धामधूम सुरु आहे. महाराष्ट्रात सर्वत्र होळीचा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र ऐन होळीच्या सणादिवशी बुलढाण्यातील एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बुलढाण्यातील राज्य शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त झालेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. कैलास नागरे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळत नसल्याने शासनाच्या निषेधार्थ त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील प्रगतीशील आणि राज्य पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी कैलास अर्जुन नागरे यांनी आज सकाळी आत्महत्या केली. त्यांनी त्यांच्या शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चार पानी सुसाईड नोटही लिहून ठेवली.
कैलास नागरे हा युवा शेतकरी गेल्या अनेक दिवसापासून देऊळगाव राजा परिसरातील शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून शाश्वत पाणी मिळावं, यासाठी लढा देत होता. डिसेंबर महिन्यात त्यांनी दहा दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. मात्र परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने मी आत्महत्या करत आहे, असे नमूद करत त्यांनी जीवन संपवले.
कैलास नागरे हे या परिसरातील शेतकऱ्यांचे आवडते युवा शेतकरी होते. जोपर्यंत पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी या ठिकाणी येऊन दिवंगत कैलास नागरे यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा ठोस आश्वासन देत नाही, तोपर्यंत शेतातून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांना नेऊ देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झालेला आहे. सध्या पोलीस या ठिकाणी पोहोचले आहेत. काही वेळापूर्वीच कैलास यांनी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात हजारो शेतकरी जमले आहेत.