
बुलढाण्याच्या केस गळती प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. बुलढाण्याच्या शेगावमधील काही गावांमध्ये लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांचे केस गेल्या काही महिन्यांपासून अचानक गळायला सुरुवात झाली आहे. याप्रकरणी संशोधक डॉ .हिम्मतराव बावस्कर यांनी शोध घेतला असता एक धक्कादायक कारण समोर आले आहे. बुलढाण्यातली केस गळती प्रकरणाचा थेट संबंध पंजाब आणि हरियाणाशी असल्याचे समोर आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांना झालेल्या केस गळती प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. केस गळतीचे नेमके कारण शोधण्यात सहकारी संस्थांना यश आले आहे. मात्र तरीही सरकारी संस्थांकडून अद्याप केस गळतीचे नेमके कारण जाहीर करण्यात आले नाही. पण ज्येष्ठ संशोधक हिम्मतराव बाविस्कर यांनी या केस गळतीच्या कारणाचे मूळ शोधून काढले आहे. बुलढाण्यातील गावातील लोकांनी खाल्लेल्या रेशनच्या गहूमुळे हे झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. या गहूमध्ये सेलेनियमसारखा घटक मोठ्या प्रमाणात आढळला आहे आणि हा घटक शरीरात गेल्याने ही केस गळती झाल्याचा आरोप डॉ. बावस्कर यांनी केला आहे.
एवढेच नाही तर हा गहू पंजाब आणि हरियाणाच्या शिवालिक टेकड्यांमधून आला आहे. या गव्हाच्या पिकाने दगडातील सेलेनियम हा घटक शोषून घेतला. हाच गहू रेशनच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यात वाटप झाल्याचा दावा संशोधक हिम्मतराव बावस्कर यांनी केला आहे. त्यामुळे केस गळती प्रकरणाचे मूळ रेशनच्या माध्यमातून विषारी गहू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या केस गळती प्रकरणाचा शोध घेण्यासाठी स्थानिक आरोग्य यंत्रणा, राष्ट्रीय पातळीवरील आयसीएमआर या संस्थांनी संशोधनासाठी केस गळतीने बाधित नागरिकांचे केस, रक्ताचे नमुने तपासणीसाठी नेले होते. याला दोन महिने उलटून गेले. तरी या केस गळतीच्या प्रकरणामध्ये कुठलाच खुलासा करण्यात आला नाही.
महत्त्वाची बाब म्हणजे या आधीच शरीरामध्ये सेलेनियमचे प्रमाण वाढल्याने ही केस गळती झाल्याने सरकारकडून बुलढाणा जिल्ह्याला वितरित करण्यात येणाऱ्या रेशनच्या गव्हाचे गोदाम सील करण्यात आले आहे. सध्या दुसऱ्या गोदामातून धान्य वितरित होत आहे. त्यामुळे सरकार रेशनच्या धान्याच्या माध्यमातून लोकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. या प्रकारात अद्यापही सरकार आणि प्रशासकीय अधिकारी गप्प बसले आहेत. तसेच सरकार आणि प्रशासन लोकांपासून काय लपवून ठेवत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. बुलढाणा जिल्ह्यात 293 केस गळतीचे रुग्ण आढळलं आहेत आणि त्यातील काही रुग्णांना औषधोपचार केल्याने केस पुन्हा येत आहे.