बुलडाण्याचे पालकमंत्री हरवले हो! शरद पवार राष्ट्रवादीची पोलिसात तक्रार; अतिवृष्टीत दोन्ही पालकमंत्री गायब झाल्याचा दावा

Makarand Patil, Sanjay Savakare : बुलडाणा जिल्ह्याचे दोन्ही पालकमंत्री हरवल्याची तक्रार राष्ट्रवादी शरद पवार गटाने दिल्याने खळबळ उडाली आहे. पालकमंत्री मकरंद पाटील यांच्यासह पालकमंत्री संजय सावकारे गायब झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जिल्ह्याला 2 पालकमंत्री असूनही अतिवृष्टीत जिल्हा अनाथ झाल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे.

बुलडाण्याचे पालकमंत्री हरवले हो! शरद पवार राष्ट्रवादीची पोलिसात तक्रार; अतिवृष्टीत दोन्ही पालकमंत्री गायब झाल्याचा दावा
दोन्ही पालकमंत्री गायब झाल्याची पोलिसांत तक्रार
| Updated on: Sep 25, 2025 | 10:53 AM

बुलडाणा जिल्ह्याचे दोन्ही पालकमंत्री हरवल्याची तक्रार राष्ट्रवादी शरद पवार गटाने दिल्याने खळबळ उडाली आहे. पालकमंत्री मकरंद पाटील (Makrand Patil) यांच्यासह पालकमंत्री संजय सावकारे (Sanjay Savkare)गायब झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जिल्ह्याला 2 पालकमंत्री असूनही अतिवृष्टीत जिल्हा अनाथ झाल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा आणि परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हजारो हेक्टर शेती पाण्याखाली

महाराष्ट्र सह बुलडाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली. त्यामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. शेतकरी पूर्णतः खचून गेला आहे. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने तात्काळ मदतीची गरज असतांना बुलडाणा जिल्ह्याला 2 पालकमंत्री आहेत. मात्र त्यातील एकही पालकमंत्री अजूनही जिल्ह्यात दाखल झाला नाही. त्यामुळे दोन्ही पालकमंत्री हरवल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली असून त्यांना शोधून देण्याची मागणी बुलडाणा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाने केली आहे.

ही मदत तर तुटपुंजी

बुलडाणा जिल्ह्यात दुसरबीड आणि सोनोशी महसूल मंडळात झालेल्या ढगफुटीने शेतकऱ्यांचे अक्षरश कंबरडे मोडले आहे. होत्याचं नव्हते झाले आहे. नदी काठावरील शेती तर खरडून गेलीय. उभी पीक पाण्यात वाहून गेल्याने सिंदखेड राजा तालुक्यातील सोनोशी, वर्दाडी, गारखेड, रुम्हनासह परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात आजही पाणी असून पीक सडत आहेत. सरकारने जी मदत जाहीर केली ती अतिशय तुटपुंजी असून जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, हेक्टरी 50 हजार मदत करावी, मागील पिक विमा तत्काळ द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सिंदखेड राजा तालुक्यात ढगफुटी

सिंदखेड राजा तालुक्यात दुसरबीड आणि सोनोशी या महसूल मंडळात ढगफुटी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नदी काठावरील शेती खरडून गेली आहे. अक्षरशः हात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे आता दिवाळी कशी साजरी करायची, असा संतप्त सवाल नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे. तर शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करायची असेल तर तात्काळ पंचनामा करून जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्यावी, शेतकरी कर्जमुक्त करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.