भूत उतरवण्याच्या नावाखाली शिवा महाराजाकडून महिलेला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

शिवा महाराज दारू सोडवण्यासाठी मारहाण तर करतोच पण भूत उतरवण्यासाठी सुद्धा मारतो. शिवा महाराज पुरुषांनाच नव्हे तर महिलांनाही मारहाण करतो, असं आता समोर आलेल्या नव्या व्हायरल व्हिडीओतून स्पष्ट होत आहे. या शिवा महाराजांवर कारवाई व्हावी, अशी मागणी आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.

भूत उतरवण्याच्या नावाखाली शिवा महाराजाकडून महिलेला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
भूत उतरवण्याच्या नावाखाली शिवा महाराजाकडून महिलेला मारहाण
| Edited By: | Updated on: Jun 30, 2024 | 5:45 PM

दारू सोडवण्यासाठी आलेल्या व्यक्तीला बुलढाणातील घाटनांद्रा येथील शिवाजी बर्डे उर्फ शिवा महाराजाकडून बेदम मारहाण करण्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला. या प्रकरणी मार खाणारा व्यक्ती राजेश राठोड याने रायपूर पोलीस ठाण्यात जावून तक्रार दिल्याने शिवाजी बरडे उर्फ शिवा महाराज यांच्याविरुद्ध काल मारहाण केल्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल झालाय. महाराजाचे हे प्रकरण गाजत असतानाच आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हीडिओमध्ये शिवा महाराज एका महिलेला मारहाण करताना दिसत आहे.

शिवा महाराजाला महिलेला मारहाण करतानाच्या व्हिडिओतील संभाषणावरून हे सिद्ध होते की, महाराज त्या महिलेच्या अंगातील भूतबाधा उतरवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे महाराजाकडून जादूटोणा विरोधी कायद्याचा भंग झालाय. मार खाणारी महिला कोण आहे, कुठली आहे? हे अद्याप तरी समोर आलेलं नाही. मात्र भूत उतरविण्याचा प्रकार महाराज करत असल्याचे त्यात दिसत आहे. आता महाराजावर प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते? याकडे लक्ष लागून आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बाबाला अटक करण्याची मागणी

दरम्यान, तथाकथित बुवाने एका मुलीच्या अंगातील भूत उतरवण्याच्या बाहण्याने तिला जी मारझोड केली, तिचे केस उपटले, हा महाराष्ट्र शासनाच्या जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत अनुसूची 1 नुसार गुन्हा आहे. अशाप्रकारे भूत उतरवण्याच्या बाहण्याने मारझोड करणे, तिचे केस उपटणे, अघोरी उपचार करणे, हा गुन्हा आहे. त्यामुळे संबंधित महाराजावर तात्काळ गुन्हा नोंदविण्यात यावा आणि बाबाला अटक व्हावी, अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.