‘देशात हेलिकॉप्टरने शेतात जाणारा मुख्यमंत्री दाखवा अन् एक लाख मिळवा’, उद्धव ठाकरे यांनी उडवली एकनाथ शिंदे यांची खिल्ली

| Updated on: Nov 26, 2022 | 7:11 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली.

देशात हेलिकॉप्टरने शेतात जाणारा मुख्यमंत्री दाखवा अन् एक लाख मिळवा, उद्धव ठाकरे यांनी उडवली एकनाथ शिंदे यांची खिल्ली
Follow us on

मुंबई : “देशात दुसरा हेलिकॉप्टरने शेतात जाणारा मुख्यमंत्री दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा”, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली. उद्धव ठाकरेंनी आज बुलढाण्यातील चिखलीमध्ये शेतकरी संवाद मेळावा घेतला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर सडकून टीका केली.

“तोतये बनावट गद्दार आहेत. त्यांचं कर्तृत्व शून्य आहे. ते तुम्हाला फसवत आहे. भाजपवाले तुम्हाला सांगतील. तुमच्यातला मुख्यमंत्री केला. हा मुख्यमंत्री तुम्हाला मान्य आहे का? दिवाळीत एक युट्यूबवर व्हिडीओ पाहिला. दिवाळीत मुख्यमंत्री रमले शेतीत. पाहिला का व्हिडीओ? पूर्वी भिंतीवर लिहिलेलं असायचं नारूचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा. आता तसं म्हणायचं का?”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

“देशात दुसरा हेलिकॉप्टरने शेतात जाणारा मुख्यमंत्री दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा. हेलिकॉप्टर शेतात उतरतं. आणि तुम्ही शेतात पायी जाताना. दिवसा वीज असते की नसते? मग रात्रीचं जाता?”, असे प्रश्न उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना विचारले.

“हा आमचा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने शेतात जातो. माझं त्यांच्या सुबत्तेबद्दल काही म्हणणं नाही. पण महाराष्ट्रातील शेतकरी असा कधी होणार? हा सवाल आहे. महाराष्ट्रातील शेतकरी कधी तरी हेलिकॉप्टरने जाणार का? तुम्ही ज्योतिषाकडे जाता. आमचा शेतकऱ्याच्या हातावरच्या रेषा पुसल्या त्याने कुणाला हात दाखवायचा?”, असा सवाल त्यांनी केला.

“तुम्ही पत्रकारांना घेऊन तुमच्या शेतात गेला. तसाच तुम्ही अतिवृष्टी झालेल्या शेतात पत्रकारांना का घेऊन गेला नाही? मला म्हणत होते मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाही. तेव्हा करोना होता. माझ्या मानेचं ऑपरेशन झालं. पण तरीही तुमचं काम केलं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“तुम्ही विदर्भात या, मराठवाड्यात या. तुम्ही एकदम घरातून बाहेर पडला थेट गुवाहाटीला जाता. शेतकऱ्यांची हालत सांभाळायची कुणी?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

उद्धव ठाकरे आणखी काय-काय म्हणाले?

काही लोक ४० रेडे घेऊन गुवाहाटीला गेले. त्यांच्याच मंत्र्याने म्हटलं आमचे ४० रेडे तिकडे गेले आहे. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मी एकविरा देवीचे दर्शन घेतले. नंतर अयोध्येला गेलो होतो. हे गेल्या आठवड्यात हात दाखवायला गेले होते. ज्याचं भविष्य त्याला माहीत नाही तो आपलं भविष्य ठरवणार. तुमचं भविष्य सर्वांना माहीत आहे. यांचे मायबाप दिल्लीत आहेत. तुमचं भविष्य ठरविणारे दिल्लीत बसलेत. हिंदुत्व वाचवण्यासाठी शिवसेना सोडून गेल्याचं ते म्हणातात.

तुम्हाला पाहिल्यानंतर अन्याय जाळायला निघालेल्या या मशाली आहेत असं दिसतं. आपलं सरकार चांगलं चाललं होतं. यांनी आपलं सरकार पाडलं.

भाजप हा भाकड पक्ष झाला आहे. विचार संपले आहेत. नेते संपले आहेत. त्यांचे सर्व नेते आयात केलेले आहेत. हा आयात पक्ष आणि त्यांची दादागिरी सुरू आहे. या आयात पक्षाची दादागिरी मोडता येणार नाही का. हा पक्ष आहे का चोरबाजार आहे. यांच्याकडे काहीच शिल्लक राहिलं नाही.

संविधान दिन म्हटल्यावर काय म्हणायचं हा प्रश्न आहे. हे संविधान आज सुरक्षित आहे का इथून सुरुवात होते. मी आणि प्रकाश आंबेडकर एका मंचावर आलो होतो. त्यांनी जो प्रश्न विचारला होता तो माझ्या मनात नाही सर्वांच्या मनात असला पाहिजे. कारण आज लोकशाही वाचवण्याची गरज आहे. आज हुकूमशाही हवी की लोकशाही हा प्रश्न आहे.