रुपाली चाकणकरांपाठोपाठ ठाकरे गटाचा दिग्गज नेताही भोंदू बाबा खरातच्या दरबारी, फोटोंमुळे खळबळ

नाशिकमधील भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातसोबत मिलिंद नार्वेकर आणि इतर बड्या नेत्यांचे फोटो व्हायरल झाल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ आणि २०० कोटींच्या मालमत्तेचा SIT कडून तपास सुरू आहे.

रुपाली चाकणकरांपाठोपाठ ठाकरे गटाचा दिग्गज नेताही भोंदू बाबा खरातच्या दरबारी, फोटोंमुळे खळबळ
Milind Narvekar Ashok Kharat
| Updated on: Mar 20, 2026 | 11:00 AM

स्वतःला मर्चंट नेव्हीचा निवृत्त कॅप्टन सांगून आध्यात्मिक गुरुच्या वेषात महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरात म्हणजेच कॅप्टन खरातचे कारनामे उघड झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशोक खरातच्या दरबारात राज्यातील दिग्गज नेत्यांची मोठी उठबस असल्याचे समोर आले आहे. शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांचे कॅप्टन खरातसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

बड्या नेत्यांचे कॅप्टन कनेक्शन

अशोक खरातने सिन्नरच्या मिरगाव येथे ‘श्री ईशान्येश्वर मंदिर’ नावाचे भव्य संस्थान उभारले होते. केवळ मिलिंद नार्वेकरच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील दिग्गज नेते त्याच्या संपर्कात होते. सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंचे नेते खरातच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, सुनील तटकरे, सरोज अहिरे, जयंत पाटील, निलेश लंके आणि विखे पाटील यांसारख्या बड्या नेत्यांचे खरातसोबतचे फोटो पाहायला मिळत आहे. यामुळे भोंदू बाबांचे जाळे राजकारण्यांच्या किती खोलवर पोहोचले होते, याची माहिती उघड होताना दिसत आहे.

नेमकं काय घडलं?

एका ३५ वर्षीय महिलेने खरातवर गुंगीचे औषध देऊन वारंवार बलात्कार केल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला, तेव्हा खरातच्या आश्रमातून धक्कादायक माहिती समोर आली. त्याच्या फार्महाऊसवर झालेल्या छाप्यात पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि मोठी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

सध्या या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाद्वारे (SIT) केली जात आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईल आणि लॅपटॉपच्या फॉरेन्सिक तपासातून तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत. या व्हिडीओमध्ये अनेक महिला असल्याचे स्पष्ट झाले असून, खरातने ‘अंकशास्त्रज्ञ’ आणि ‘कॉस्मॉलॉजी तज्ज्ञ’ बनून शेकडो महिलांची फसवणूक केल्याचा संशय आहे. कॅप्टन खरातकडे नाशिक, सिन्नर आणि शिर्डी परिसरात सुमारे २०० कोटींची बेकायदेशीर मालमत्ता असल्याचा पोलिसांना संशय आहे.

मर्चंट नेव्हीतील नोकरी सोडल्यानंतर त्याने अल्पावधीत इतकी मोठी संपत्ती कशी जमवली, याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेमार्फत केला जात आहे. या संपूर्ण गुन्ह्यात खरातचे मोठे जाळे असून त्याचे आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या सहकाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

Follow Us