म.रे.चं रडगाणं सुरूच, अंबरनाथ–बदलापूर दरम्यान लोकल सेवा ठप्प; प्रवाशांचे हाल सुरूच

अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान आज सकाळी 6 च्या सुमारास मालगाडीचे इंजिन बिघडलं आणि त्यामुळे मागोमाग येणाऱ्या लोकलही अडकून पडल्या आणि वाहतूक ठप्प झाली. यामुळे पहाटे लवकर गाडी पकडून कामावर निघालेल्या प्रवाशांचे मात्र मोठे हाल होत आहेत.

म.रे.चं रडगाणं सुरूच, अंबरनाथ–बदलापूर दरम्यान लोकल सेवा ठप्प; प्रवाशांचे हाल सुरूच
मध्य रेल्वे विस्कळीत
| Updated on: Aug 29, 2025 | 8:15 AM

रोज मरे त्याला कोण रडे? अशी एक म्हण तुमच्यापैकी अनेक लोकांनी ऐकली असेलच. सतत रडणाऱ्या, कटकट करणाऱ्यावा कोणी विचारत नाही असा त्याचा थोडक्यात अर्थ. पण लाखो मुंबईकरांचा भार वाहून नेणारी, त्यांची लाईफलाइन म्हटली जाणारी मध्य रेल्वे अर्थाच म.रे. हिचंही रडगाण आजही सुरूच आहे. मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत झाली आहे. अंबरनाथ–बदलापूर दरम्यान मालगाडी इंजिन बिघाड झाल्यामुळे लोकल सेवा मात्र ठप्प झाली असून याचा फटका कामावर निघालेल्या अनेक नोकरदारांना बसला आहे. आधीच प्रचंड गर्दी त्यात लोकल ठप्प झाल्यामुळे गर्दीचा रेटा आणखीन वाढून तो त्रास सहन करत असतानाच कामावर लेट पोहोचण्याचं टेन्शनही अनेक कर्मचाऱ्यांना सतावत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान आज सकाळी ( शुक्रवार) 6 च्या सुमारास मालगाडीचे इंजिन बिघडलं आणि त्यामुळे मागोमाग येणाऱ्या लोकलही अडकून पडल्या आणि वाहतूक ठप्प झाली. यामुळे पहाटे लवकर गाडी पकडून कामावर निघालेल्या प्रवाशांचे मात्र मोठे हाल होत असून ते तर मागच्या लोकलमध्येच अडकून पडले आहेत. कर्जतहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या या 20 ते 25 मिनिचे उशिराने धावत आहेत. तर अंबरनाथ वरून कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या सर्वच लोकल सेवाही ठप्प झाली आहे.

मध्य रेल्वेची सेवा ठप्प झाल्यामुळे विविध रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी झाली असून प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. लोकलसेवा ठप्प झाल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केली असून थोड्याच वेळात रेल्वेसेवा सुरू होईल असे समजते. मात्र संपूर्ण रेल्वे सेवा सुरळीत होण्यासाठी काही कालावधी जाऊ शकतो, तोपर्यंत गर्दीचा रेटा वाढण्याची शक्यत आहे. दररोजच्या प्रवासावर परिणाम झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

बातमी अपडेट होत आहे.