रस्ते अपघातात झालेलं प्रार्थना बेहेरेच्या बाबांचं निधन; अश्रू पुसत म्हणाली “हे दु:ख..”
मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेनं नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या दिवंगत वडिलांविषयी बोलताना भावूक होते. त्याचसोबत या व्हिडीओद्वारे तिने खास घोषणासुद्धा केली आहे.

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या वडिलांचं 14 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झालं होतं. एका रस्ते अपघातात त्यांनी आपले प्राण गमावले होते. वडिलांच्या निधनानंतर प्रार्थनाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या होत्या. आता त्यांच्या निधनाच्या दोन महिन्यानंतर प्रार्थनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये बाबांबद्दल बोलताना तिला अश्रू अनावर होतात. प्रार्थनाने या व्हिडीओच्या माध्यमातून खास माहिती दिली आहे. त्यावर मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
काय म्हणाली प्रार्थना?
“आज हा व्हिडीओ करण्यामागचं कारण म्हणजे आज 14 तारीख आहे. माझ्या बाबांना जाऊन दोन महिने झाले. मला खरंतर सुचत नाहीये, कारण मी कधीच तुमच्यासमोर मोकळेपणे व्यक्त झाले नाही. मला कसं वाटतंय, हे तुम्हा सर्वांना समजलंय. तुमचे मेसेज मी वाचले. पण ते दु:ख आहे आणि ते कायम राहील. ते मी सांगू शकत नाही. पण माझे बाबा नेहमी मला म्हणायचे की आयुष्यात नेहमी खुश राहा. आनंदी राहायचा प्रयत्न कर. तू एक अभिनेत्री आहेस, सर्वांचं मनोरंजन करण्याचं तुझं काम आहे. तूझं काम चोख कर, छान कर,” असं ती म्हणाली.
View this post on Instagram
“ते असताना मी जे काम केलं होतं, ते नसताना आता बाहेर येणार आहे. बाबांचा आशीर्वाद कायम माझ्यासोबत आहे, पण मला तुमचाही आशीर्वाद हवा आहे. बाबा मला नेहमी म्हणायचे की मी तुझा खूप मोठा फॅन आहे. आता बाबा नाहीयेत, पण मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण माझ्यासोबत आहात. उद्या काहीतरी स्पेशल घेऊन येतेय, जे खरंतर माझ्या बाबांसाठी आहे, तुमच्या सर्वांसाठी आहे. त्यासाठी मला तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हवे आहेत. माझं हे काम बाबा असताना त्यांनी बघितलं होतं. आता उद्या ते तुमच्यासमोर येईल,” अशा शब्दांत प्रार्थना व्यक्त झाली.
प्रार्थनाच्या या पोस्टवर अभिनेत्री तेजस्विनी पंडितने लिहिलं, ‘हा तुझा सर्वोत्तम प्रोजेक्ट ठरेल. माझ्यावर विश्वास ठेव.. शुभेच्छा.’ तेजस्विनीनेही काही महिन्यांपूर्वी तिच्या आईला गमावलं होतं. तर अभिनेत्री हृता दुर्गुळेनं लिहिलं, ‘तुझा घट्ट मिठी.’ नेटकऱ्यांनीही प्रार्थनाला तिच्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘तुमचे बाबा सदैव तुमच्यासोबत आहेत. आठवणीच्या स्वरूपात त्यांचा आशीर्वाद नेहमीच असणार आहे,’ असं चाहत्यांनी म्हटलंय.
