गोकुळ निवडणुकीआधी महायुतीचा मोठा निर्णय! जागावाटप निश्चित; अधिकृत उमेदवारांची घोषणा कधी?
Gokul Election Mahayuti Seat Sharing Formula: गोकुळ निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. चंद्रकांत पाटलांनी याची अधिकृतपणे घोषणा केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठीचा जागावाटपाचा तिढा आता सुटला आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांच्या बैठकांना वेग आला आहे. बुधवारी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 9, शिवसेनेला 7, भाजपला 7 आणि जनसुराज्य शक्तीला 2 जागा देण्याचे ठरले आहे.
या पत्रकार परिषदेला मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने यांच्यासह महायुतीचे अन्य नेते उपस्थित होते. गोकुळच्या जागावाटपावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चा आणि बैठका सुरू होत्या. काही जागांवरून मतभेद असल्याचेही समोर आले होते. मात्र अखेर चर्चेतून जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. मतभेद होते, मनभेद नाहीत, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी महायुतीतील समन्वय स्पष्ट केला आहे.
जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असला तरी कोणत्या पक्षाला कोणत्या जागा मिळणार, यावर अद्याप चर्चा सुरू आहे. उमेदवारांची अंतिम निवड करण्यासाठी महायुतीकडून आणखी बैठका होण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी 11 वाजता महायुतीच्या पॅनेलमधील उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच 11 ऑक्टोबरला महायुतीचा मेळावा घेऊन गोकुळ निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात गोकुळच्या निवडणुकीतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
तर याआधी मंत्री हसन मुश्रीफ यांनीही गोकुळ निवडणुकीतील उमेदवारीवरून महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. महायुतीच्या बैठका सुरू असून ज्यांना उमेदवारीची संधी मिळणार नाही, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विशेष म्हणजे महायुतीकडून संधी न मिळणारे काही इच्छुक सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत महायुतीसमोर बंडखोरी आणि नाराजीचं आव्हान कायम राहण्याची शक्यता आहे.
या सगळ्यावर आम्ही आवश्यक ती सगळी खबरदारी घेत आहोत, असं हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी गोकुळ निवडणुकीवरून भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपला प्रत्येक संस्था ताब्यात घ्यायच्या आहेत. गोकुळच्या बाबतीतही हेच होणार आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध विरोधक असा सामना रंगण्याची चिन्हं आहेत.