शिंदेंच्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; थेट राजकीय समीकरणावर परिणाम होणार
चंद्रपुरात शिंदेंच्या नेत्याने तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याने चंद्रपुरातील राजकीय समीकरणावर थेट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात हे.

चंद्रपुरातून मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. चंद्रपूरच्या पालकमंत्री हटाव अभियान करण्यात आलं. या अभियानाची सुरुवात शिंदे गटाच्या नेत्याने केली. परंतु सत्तेत असतानाही पालकमंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेणे शिंदे गटाच्या नेत्याला महागात पडलं आहे. पक्षाने हकालपट्टीची ताकीद दिल्यानंतर स्वत: शिंदेंच्या नेत्याने पक्षाची साथ सोडली.
चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उइके हटाव अभियान सुरू करणारे शिवसेना शिंदे गटाचे नेते ललित कासट यांनी पक्षाचा राजीनामा दिला. ललित कासट आणि त्यांच्या समर्थक शिवसैनिकांनी त्यांच्या गळ्यातील शिवसेनेचे पट्टे काढून राजीनाम्याची घोषणा केली. ‘मी कुठल्याही प्रकारे पक्षाचं नाव आणि बॅनर वापरलं नसताना देखील माझ्यामुळे पक्षाची बदनामी होत असल्याची शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. त्यामुळे माझी शिवसेनेतून हकालपट्टी करण्याची ताकीद देण्यात आली. मात्र मी पालकमंत्र्यांच्या निष्क्रियतेविरोधात सुरू केलेलं आंदोलन थांबवणार नसल्यामुळे पक्षाचा राजीनामा देत असल्याचं कासट यांनी जाहीर केलं. पालकमंत्र्यांच्या विरोधात सुरू असलेलं आंदोलन पुढेही सुरू राहील, असा निर्वाळा देखील कासट यांनी दिला. ललित कासट यांनी शिंदेंची शिवसेना सोडल्यानंतर काय भूमिका घेणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. आता ललित कासट कोणत्या पक्षात प्रवेश करणार, यावरून चर्चा सुरू झाली आहे. परंतु कासट यांनी कोणत्या पक्षाची साथ धरणार, हे स्पष्ट केलेले नाही.
जुन्नरच्या देवराम लांडेंचा राजीनामा
दरम्यान, पुण्याच्या देवराम लांडे प्रकरणात सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीने कठोर भूमिका घेतली. पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर देवराम लांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली होती. मनसे कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्यानंतर देवराम लांडे यांनी कार्यालयात जाऊन माफी मागितली. या प्रकरणात राष्ट्रवादीने अधिकृत भूमिका देखील स्पष्ट केली. कोणत्याही अनुचित प्रकाराचे पक्ष समर्थन करणार नाही, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादीने घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीने देवराम लांडेंचा राजीनामा घेतला.