‘…तर राज ठाकरे यांनी तो निर्णय घ्यावा’; मनसे, ठाकरे गट युतीवर बावनकुळे स्पष्टच बोलले

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सहकुटुंब साईबाबांचं दर्शन घेतलं, यावेळी त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली.

...तर राज ठाकरे यांनी तो निर्णय घ्यावा; मनसे, ठाकरे गट युतीवर बावनकुळे स्पष्टच बोलले
Image Credit source: TV9 Hindi
| Updated on: Apr 26, 2025 | 8:57 PM

मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शिर्डीमध्ये सहकुटुंब साईबाबांचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. मी गेल्या 33 वर्षांपासून शिर्डीला दर्शनासाठी येत आहे.  26 एप्रिलला माझ्या मुलीचा वाढदिवस असल्याने त्यानिमित्त मी दरवर्षी साईदर्शनासाठी येतो. आज मी सहकुटुंब दर्शनासाठी आलो आहे, हा माझा शासकीय किंवा राजकीय दौरा नाही असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, आमचं सरकार राज्यातील पर्यटनस्थळे आणि यात्रास्थळे सुरक्षित करण्याकरीता काम करत आहे , ही सरकारची पहिली जबाबदारी आहे. पोलीस आणि इतर यंत्रणा लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान सध्या मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या युतीची जोरदार चर्चा सुरू आहे, यावर देखील यावेळी बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या देशात प्रत्येकाला निर्णय घेण्याचं स्वतंत्र अधिकार आहेत,  राज ठाकरे आणि उद्धवजी एकत्र येत असतील तर त्यात आम्हाला काही अडचण नाही. परिवार एकत्र येत असेल तर राज ठाकरे यांनी तो निर्णय घ्यावा, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया 

मंगळवारी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला, या हल्ल्यात 26  लोकांचा मृत्यू झाला, मृतांमध्ये महाराष्ट्रातील देखील 6 जणांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केला आहे, त्यांना देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावर देखील बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे पाकिस्तानी नागरिक भारतात अधिकृत आलेत त्यांना पुन्हा पाकिस्तानला जावं लागणार आहे. पोलिसांकडूनही सातत्याने शोध मोहीम सुरू आहे. त्यांना शोधून त्यांच्या देशात पाठवणे ही निरंतर प्रकीया सुरू आहे असंही ते यावेळी म्हणाले.

राज्यात नवीन वाळू धोरण लागू झाल आहे, यासंदर्भात सर्व निविदा  15 मे पर्यंत पूर्ण करणार आहे.  त्यानंतर राज्याला नवीन वाळू धोरणानुसार वाळू मिळणार आहे. घरकुल योजनेतील लाभार्थींना मोफत पाच ब्रास वाळू घरपोहोच देण्यात येणार आहे. 20 लक्ष घरकुलांना मोफत वाळू देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.