सुनेत्रा पवार दादांसारखे काम करत नाहीत, रोहित पवारांच्या विधानावर बावनकुळेंचा संताप, लाज काढली!
रोहित पवार पिसाळल्यासारखे वागत आहेत, असा संतापही बावनकुळेंनी व्यक्त केला. यासह सुप्रिया सुळे यांना राजकारणाचा खूप अनुभव आहे. सुप्रिया सुळे या देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवतात, असा हल्लाबोल बावनकुळे यांनी केला.

मयुरेश जाधव, टीव्ही 9 मराठी, मुंबई : पुण्यातील मंदार किवळे हल्ला प्रकरणाने महाराष्ट्र हादरलाय. खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे पालकमंत्रिपद स्वत:कडे घ्यावे, अशी मागणी केलीय. यावर बोलताना आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांवर टीका केलीय. सोबतच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिवंगत नेते अजित पवार यांच्याप्रमाणे काम करत नाहीत असा दावाही केलाय. यावरच आता भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी रोहित पवार यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठलाय, अशा शब्दांत रोहित पवारांना सुनावलंय.
रोहित पवारांना असं बोलणं शोभत नाही
रोहित पवार हे राज्याचे संस्कार, संस्कृती विसरले आहेत. सुनेत्राताई पवार यांना प्रशासन चालवता येत नाही. त्यांना पालकमंत्रिपद सांभाळता येत नाही, असं बोलनं हे रोहित पवार यांना शोभत नाही. सुनेत्रा पवार या आदर्श, संस्कारमय, प्रशासनाची जाण असलेल्या नेत्या आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी पक्षावर, सरकारवर एक पकड तयार केली आहे. त्या आपल्या खात्याचे काम चांगल्या पद्धतीने करत आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, असे प्रत्युत्तर बावनकुळे यांनी रोहित पवारांना दिले.
रोहित पवारांनी स्वत:ची पत घालून घेतली
तसेच, सुनेत्रा पवार राजकारणात कधी एवढ्या सक्रीय नव्हत्या. अनेकजण 25-25 वर्षे आमदार, खासदार राहूनही अनेकांना प्रशासनावर नियंत्रण मिळवता येत नाही. परंतु खूप कमी काळात सूनेत्रा पवार यांनी प्रशासनावर पकड मिळवली आहे. रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्याविषयी अशा पद्धतीने बोलणे राज्यातील जनतेला मान्य नाही. सुनेत्रा पवार यांनी पुण्यात अत्यंत चांगल्या पद्धतीने काम सुरू केले आहे. रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्याबद्दल अशा पद्धतीने बोलून स्वत:ची पत घालून घेतली आहे, असा हल्लाबोल बावनकुळेंनी रोहित पवार यांच्यावर केला.
रोहित पवार पिसाळल्यासारखे वागत आहेत
पुण्यात मंदार किवळे याच्यावर हल्ला झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे पालकमंत्रिपद स्वीकारावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीय. तर फडणवीस पुण्याचे पालकमंत्री झाल्यास जिल्ह्याचे वाटोळे होईल, अशी टीका रोहित पवार यांनी केलीय. यावरही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. रोहित पवार पिसाळल्यासारखे वागत आहेत, असा संतापही बावनकुळेंनी व्यक्त केला. यासह सुप्रिया सुळे यांना राजकारणाचा खूप अनुभव आहे. सुप्रिया सुळे या देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवतात. परंतु राजकारणासाठी प्रत्येक ठिकाणी टीका करणे योग्य नाही, अशा शब्दांत बावनकुळेंनी रोहित पवारांना सुनावलं.
देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्री होणार नाहीत. तसं पाहायचं झालं तर सुनेत्रा पवार या सक्षम आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पुण्याचे वाटोळे होईल, असे बोलणे निर्लज्जपणाचे लक्षण आहे, अशी घणाघाती टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोहित पवार यांच्यावर केली.