राहुल नार्वेकरांनी आदिवासींच्या जमिनी लाटल्या; राऊतांच्या आरोपावर महसूल मंत्री बावनकुळे थेट बोलले, म्हणाले…
राहुल नार्वेकरांनी आदिवासींच्या जमिनी लाटल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. राऊतांच्या आरोपावर महसूल मंत्री बावनकुळे पहिली प्रतिक्रिया दिली.

विधानसा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आदिवासींच्या जमिनी लाटल्याच्या आरोप खासदार संजय राऊतांनी केला आहे. राऊतांनी सलग दुसऱ्या दिवशी राहुल नार्वेकर यांच्यावर आरोप केला. नार्वेकरांवरील आरोपाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. एकीकडे नार्वेकरांनी राऊतांचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यानंतरही दुसऱ्या दिवशी राऊतांनी नार्वेकरांवर केलेल्या आरोपाचा पुन्हा उल्लेख केला. संजय राऊतांच्या आरोपावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तक्रार असेल तर कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिली.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘संजय राऊत यांच्याकडे कुणाची तक्रार असेल तर सरकारकडे पाठवली पाहिजे सरकार महसूल खातं चौकशी करेल. तक्रार न देता नुसती मीडियावर प्रतिक्रिया देणे प्रसिद्धी मिळवणे आणि राहुल नार्वेकर सारख्या सज्जन व्यक्तीवर टीकाटिप्पणी करणे योग्य नाही. नार्वेकर यांनी स्पष्ट केले या संदर्भात मानहानीचा दावा करू. आदिवासी समाजाने ही स्पष्ट केले की कुठलीही तक्रार नाही. तरीही संजय राऊत यांना वाटत असेल की, त्यांना चौकशी पाहिजे तर आम्ही चौकशी करू. मात्र काही कारण नसताना तक्रार नसताना असे आरोप लावणं योग्य नाही. मी तक्रारीची वाट बघेन तक्रार आल्यानंतर निश्चित चौकशी करू’.
अंजली आंबेडकर यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यावर बावनकुळे म्हणाले, ‘आता त्या त्या पक्षाचे अधिकार त्यांना आहेत. त्यामध्ये दुसऱ्या पक्षाने बोलणे योग्य नाही. त्या पक्षाने त्यांच्या भूमिका पुढे न्यायच्या आहेत. त्यामध्ये आपण कशाला बोलायचं’. डिलिमिटेशनवर बावनकुळे म्हणाले, ‘डिलिमिटेशन प्रत्येक पक्षाच्या आमदार खासदाराला पाहिजे. काँग्रेसच्या दबावामुळे त्यांचे आमदार खासदार शांत बसतात. मात्र त्यांना वैयक्तिक विचारल्यास त्यांनाही डिलिमिटेशन हवे आहे. लोकसभेचा मतदारसंघ तीनशे किलोमीटर असतो. त्यामध्ये कसं फिरायच. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी कसं काम करायचं. मतदारसंघ कमी आकाराचे असले पाहिजे, जेवढा छोटा मतदारसंघ तेवढं विकास जास्त होतो. सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवायचे असतील, तर छोटे मतदारसंघ असले पाहिजे. दीड दीडशे किलोमीटर लोकप्रतिनिधीला जावं लागतं. त्यामुळे डिलिमिटेशन झालं पाहिजे. डीलिमिटेशन काळाची गरज आहे. डिलिमिटेशन हे विकसित भारताकरिता अत्यंत महत्त्वाचा रोल राहील. डिलिमिटेशनला सर्वच खासदारांचा पाठिंबा आहे. मात्र पक्ष राजकारणामध्ये काही लोक दूर आहेत. सुप्रिया सुळे यांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी लोकप्रतिनिधींच्या भावना आणि अडचणी मान्य करून डिलिमिटेशनला साथ देण्याचा प्रयत्न केला आहे’.
