Chhagan Bhujbal : मुंबईत आधीच गर्दी, आता पोलीस…; मनोज जरांगेंच्या भूमिकेवर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर जाऊन आंदोलन करण्याचा निश्चय केला आहे. परंतु त्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यावर आता छगन भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Chhagan Bhujbal : मुंबईत आधीच गर्दी, आता पोलीस...; मनोज जरांगेंच्या भूमिकेवर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
chhagan bhujbal news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 14, 2026 | 1:25 PM

सुनील काळे : मुंबईतील आझाद मैदान पोलिसांनी मराठा आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतरही मनोज जरांगे पाटील भूमिकेवर ठाम आहेत. जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा परवानगीसाठी अर्ज केला आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचा कोर्टातही जाण्याचा विचार आहे. दुसरीकडे मराठा आंदोलकांनी मुंबईला जाण्यासाठी तयारी केल्याचे बोलले जात आहे. याच मुंबईतील आंदोलनावर मंत्री छगन भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाला परवानगी नाकारली असावी, असे भुजबळ म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारल्याने मराठा आंदोलकांनी एकच संताप व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी परवानगी दिली, यंदा का नाकारली जात आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. मुंबईतील आंदोलनामुळे गणेशोत्सव, गणेशभक्तांना असुविधा होऊ नये, यासाठी परवानगी नाकारल्याचे सांगितले जात आहेत. परवानगी नाकारल्यानंतर आता जरांगे यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याची तयारी सुरू केली आहे. याच आंदोलनावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, ‘मुंबईत आधीच गर्दी आहे. बंदोबस्तासाठी पोलीस अपुरे पडत आहेत. त्यामुळे आंदोलनाला परवानगी नाकारली असेल. त्यात महिलांच्या विरोधात बोलणं, जिल्हाधिकारी महिला आहेत, त्यांना वाईट बोलणं, मुख्यमंत्री यांना वाईट बोलणं, ही त्यांची संस्कृती आहे’.

घाटकोपरचे आमदार पराग शाह यांनी भिकाऱ्याच्या वेशभूषेत परिसरातील समस्या जाणून घेतल्या. पराग शाह यांच्या कृतीवर छगन भुजबळ म्हणाले, ‘अंतुले देखील वेषांतर करून लोकांच्या अडचणी काय आहेत हे जाणून घेण्यासाठी रात्री फिरायला जायचे. लोकांचे प्रश्न समजून घ्यायचे, यात काय वाईट नाही’.

मराठा बांधवांची मुंबईकडे जाण्याची तयारी

धाराशिव जिल्ह्यामध्ये मुंबईकडे निघण्यासाठी मराठा बांधवांची तयारी सुरू झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक गावातून 100 मराठा बांधव उद्या आंतरवाली सराटीकडे रवाना होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील मराठा बांधवांनी मोठा निर्णय घेतलाय. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईला जाण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us