
मराठा समाजाला कुणबी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या सरकारच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. सरकारच्या या भूमिकेवर छगन भुजबळ यांनी थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हा प्रयत्न चुकीचा आहे. सरकारने काढलेला शासन निर्णय (GR) अत्यंत संभ्रम निर्माण करणारा असून हा शासन निर्णय रद्द करावा किंवा त्यात सुधारणा करावी, अशी मागणीही त्यांनी केली. यामुळे मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात नवा वाद सुरू झाला आहे.
छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाला कुणबीमध्ये घालण्याचा हा चुकीचा प्रयत्न आहे. हा शासन निर्णय अत्यंत संभ्रमित करणारा आहे. सरकारने एकतर हा शासन निर्णय रद्द करावा, नाहीतर त्यातील संभ्रम दूर करून त्यात दुरुस्ती करावी, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.
राज्यात सध्या सुरू असलेल्या आंदोलनांवरही छगन भुजबळांनी भाष्य केले. बंजारा समाजही आता न्याय मागत आहे. त्यामुळे त्यांची मागणीही योग्य असल्याचे मला वाटते. कोणी येऊन काहीही धमकी देणार आणि तुम्ही धमक्यांना घाबरणार आहात का? कायदा हातात घेऊन आंदोलन चालवायचे आहे का? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.
यावेळी छगन भुजबळ यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल महत्त्वाचे विधान केले. विजय वडेट्टीवार हे माझे चांगले मित्र आहेत. गेल्या वर्षी जो ओबीसी एल्गार मोर्चा झाला, त्यावेळी ते फक्त एका सभेत उपस्थित होते. त्यांच्यावर दबाव होता. त्यामुळे आता ते बाकीच्या सभांना उपस्थित नव्हते. त्यामुळे आता तुम्हाला लढाई लढायची असेल, तर मागे हटू नका,” असा सल्ला छगन भुजबळांनी वडेट्टीवार यांनी दिला.
महाविकास आघाडीवर प्रश्नचिन्ह
यासोबतच छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडीलाही याबद्दल थेट प्रश्न विचारला. ओबीसी समाजाच्या संदर्भात महाविकास आघाडीची भूमिका काय आहे? असा सवाल छगन भुजबळांनी केला. या शासन निर्णयाबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी,” अशी मागणी भुजबळांनी केली. या विधानामुळे महाविकासआघाडीने मराठा आणि ओबीसी आरक्षणाबद्दलच्या भूमिकेवरील मतभेदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.