पहिलीपासून हिंदीची सक्ती नकोच, भुजबळांचाही विरोध, स्पष्टच बोलले…

राज्यात हिंदीची सक्ती आणि मराठी अस्मितेच्या प्रश्नावरून वातावरण चांगलंच तापलं आहे, यावर आता छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, पहिलीपासून हिंदी लादणे योग्य होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पहिलीपासून हिंदीची सक्ती नकोच, भुजबळांचाही विरोध, स्पष्टच बोलले...
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 26, 2025 | 7:18 PM

राज्यात सध्या हिंदी सक्ती आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर वातावरण चांगलंच तापलं आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून याच मुद्द्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.  हिंदी सिनेमा, सीरियल यामुळे घराघरात हिंदी अगोदरच पोहोचली आहे, त्यामुळे हिंदी लादण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी यावर दिली आहे.

नेमकं काय म्हणाले भुजबळ?

माझं मत वेगळे आहे,  हिंदी सिनेमा, सीरियल यामुळे घराघरात हिंदी अगोदरच पोहोचली आहे, त्यामुळे हिंदी लादण्याची गरज नाही, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा भवाळकर देखील हिंदीची सक्ती नको असे म्हणाल्या, अनेकांचं हेच मत आहे. पहिलीपासून तीन भाषा शिकवल्या तर ते कठीण होईल, आमचा हिंदीला विरोध नाहीये,  मी स्वतः एका हिंदी प्रसारक संस्थेचा गेल्या 30 वर्षापासून अध्यक्ष आहे. रविवारी मुंबईत हिंदी सभा व्हायची तेव्हा फुकट शिकायला मिळायचे,  आम्ही जरी मराठी भाषेत शिकलो असलो तरी आजकाल हिंदी सर्वांना येत आहे.
लोकांचा विरोध पाहता हिंदीचा दबाव टाकणं योग्य नाही,  अंदरसुल शाळेत मुली जापनीज भाषेत बोलत होत्या,  पण त्या मराठी शाळेत शिकत आहेत, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना भुजबळ यांनी म्हटलं की, आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन हिंदीबाबत अंतिम निर्णय घेऊ, पावसाळी अधिवेशनात खूप प्रश्न आहेत,  शेती, अवकाळी पाऊस, शिक्षण, रस्ते असे शेकडो प्रश्न आहेत. हिंदीच्या प्रश्नापेक्षा इतर प्रश्न देखील महत्त्वाचे आहेत,  मंत्री दादा भुसे हिंदी प्रश्नावर राज ठाकरे यांना जसे भेटले, तसेच अनेक नेत्यांना देखील जाऊन भेटत आहेत, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मराठी भाषेच्या मुद्द्यावर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचा मोर्चा निघणार आहे, यावर देखील भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलन करत आहेत, आनंदाची गोष्ट आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, आंदोलन करू शकतात. सरकारच्या कानावर हिंदी बाबत टाकलं आहे.  अनेक संस्था, शिक्षण तज्ज्ञ, तसेच अनेक वर्तमानपत्रे यामध्ये लेख छापून आलेले आहे.
अनेक तज्ज्ञाचे मतही तेच आहे.  पहिलीपासून हिंदी लादणे योग्य नाही, असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.