अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत का? भुजबळांनी मनातलं बोलून दाखवलं

अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत का? यावर आता मंत्री भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. यावर बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत का? भुजबळांनी मनातलं बोलून दाखवलं
Image Credit source: TV9
| Updated on: Jun 22, 2025 | 5:14 PM

राज्यात सध्या अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू आहे, अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत का? यावर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली होती, त्यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आम्हालाही सगळ्यांना वाटतं, का वाटू नये? आपल्या पक्षाचा जो कोणी नेता असेल तो जास्तीत जास्त मोठ्या पदावर गेला पाहिजे, अशी अपेक्षा असते, त्यात काय वाईट आहे? सगळ्याच पक्षातील नेत्यांची आपल्या नेतृत्वाबद्दल तशी इच्छा असते असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते लासलगावमध्ये बोलत होते.

दरम्यान एका कार्यक्रमामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आपल्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिले, त्यावर देखील छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भास्कर जाधव हे आमचे मित्र आहे,  शिवसेनेत असल्यापासूनचे आमचे ते मित्र आहेत. त्यांनी राजकारणातलं काम थांबवावं असं त्यांचं वय नाही, मित्र म्हणून तर मी हेच सांगेल. राजकारणात चढ-उतार होत असतात. सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत,   राजकारण एकदम सोडून देणे असं तुम्ही जाहीर करणं हे काही मनाला पटत नाही. मी एवढेच सांगेल राजकारणातून निवृत्त होऊ नका. राजकारणामध्ये तुमच्या -माझ्यासारख्या लोकांना सामाजिक कामं करायची आहेत, त्यांना घरी बसणं सुद्धा शक्य नाही,  अडचणी येतात आणि सुटतात सुद्धा असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान त्यांनी यावेळी बोलताना अमेरिकेनं इराणवर केलेल्या एअरस्ट्राईकवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असं काही घडणार नाही, असं म्हटलं होतं.  हे युद्ध जेवढ्या लवकर थांबेल तेवढं चांगलं होईल, युद्धात कोणाचाही फायदा होत नाही.  युद्धात जे देश सहभागी असतात त्यांचा तर फायदा होतच नाही, मात्र त्या दोन देशांवर इतर गोष्टींसाठी जे देश अवलंबून असतात त्यांना देखील त्रास होतो असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.