
केंद्र सरकारकडून पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅसचा कोणताही तुटवडा नाही असं वारंवार सांगितलं जात आहे. मात्र असं असूनही महाराष्ट्राच्या काही भागात पेट्रोल पंपांवर रांगा लागल्याच्या, पेट्रोल-डिझेलचा साठा संपल्याच्या बातम्या येत आहेत. आता छत्रपती संभाजीनगर-जालना रस्त्यावरील चिकलठाणा परिसरात रिक्षा चालकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. ऑटो एलपीजी गॅस संपल्याने आक्रमक झालेल्या रिक्षा चालकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅस संपल्याने रिक्षा चालक अडचणीत आले आहेत.
ऑटो रिक्षा चालकांनी अचानक केलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक खोळंबली. पोलीस प्रशासनाच्या मदतीने ऑटो रिक्षा चालकांनी त्यांचे रास्ता रोको आंदोलन मागे घेतलं. छत्रपती संभाजीनगर-जालना रस्त्यावर ऑटो चालकांच्या एक ते दीड किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांच्या बंदोबस्त ऑटो एलपीजी वितरण सुरू आहे.
सकाळी 5 वाजल्यापासून लागल्यात रांगा
छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक पेट्रोल पंप आऊट ऑफ स्टॉक झाले आहेत. या पेट्रोल पंपांवर दीड ते दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहनात पेट्रोल-डिझेल भरून घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये पंपावर मोठी गर्दी. कालपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक पेट्रोल पंपावर वाहनधारकांची झुंबड. बंद असलेल्या पेट्रोल पंपावर सकाळी 5 वाजल्यापासून लागल्यात रांगा आहेत. पेट्रोल पंप चालू करण्यापूर्वी लाऊड स्पीकर मधून ग्राहकांना सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.
धाराशिवमध्ये काय स्थिती?
धाराशिवमध्ये खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने आणि व्यावसायिक सिलेंडर बंद झाल्याने छोटे हॉटेल व्यवसाय अडचणीत आले आहेत. हॉटेल व्यवसायिकांना उन्हाच्या तडाख्यात 36, 37 अंश सेल्सिअस तापमानात चुलीच्या झळा सोसून जेवण बनवावं लागतं आहे. व्यावसायिक सिलेंडर बंद असल्याने लाकडाच्या किंमती वाढल्या आहेत. खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने व्यवसायामध्ये तोटा होत असल्याची हॉटेल चालकांनी माहिती दिली आहे.
सोलापुरात काय निर्बंध?
सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल, डिझेल वितरणाबाबत कडक निर्बंध लावण्यात आलेत. जिल्ह्यात पेट्रोल पंपावर कॅन, बाटली, डब्बा किंवा इतर भांड्यात पेट्रोल, डिझेल देण्यास मनाई. आखाती देशातील युद्धामुळे इंधनाचा पुरवठा सुलभ मार्गाने व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नवीन नियमावली. जिल्ह्यातील पंप चालकांनी पेट्रोल, डिझेल देताना वाहनांच्या टाकीतच पेट्रोल देण्याचे आदेश. जिल्ह्याभरात पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत करण्यात आली तसेच पेट्रोल, डिझेलची विक्री नोंदणी नियमित ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश.