मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या या बड्या नेत्याला थेट प्रपोजल; उद्धव ठाकरेंच्या बैठकीपूर्वीच घडामोडींना वेग

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, उद्या शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक बोलावली आहे, मात्र त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका सूचक वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या या बड्या नेत्याला थेट प्रपोजल; उद्धव ठाकरेंच्या बैठकीपूर्वीच घडामोडींना वेग
devendra fadnavis
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 13, 2026 | 7:53 PM

श्रीक्षेत्र भिमाशंकर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कामाची पहाणी करत असताना त्यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार बाबाजी काळे यांच्यासोबत फोटो काढण्याचा आग्रह वळसे पाटील यांनी फडणवीसांकडे धरला असताना फडणवीसांनी केलेल्या एका सूचक खुलाशामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

कार्यक्रमादरम्यान वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना बाबाजी काळेंसोबत छायाचित्र काढण्याची विनंती केली. त्यावर फडणवीसांनी मिश्कील शैलीत, “फोटोची गरज नाही बाबाजींना आम्ही एक प्रपोजल दिलं आहे,” असे वक्तव्य केले. मात्र प्रपोजल नेमकं कशाचं? याबाबत त्यांनी एक शब्दही उच्चारला नाही. विशेष म्हणजे बाबाजी काळे हे उद्धव ठाकरे गटाचे पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्याला अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. हे प्रपोजल केवळ मिश्कील टिप्पणी होती? की त्यामागे काही मोठं राजकीय गणित दडलं आहे, याबाबत आता तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या 14 जून रोजी ‘मातोश्री’वर खासदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीपूर्वीच फडणवीसांनी हे वक्तव्य केल्याने चर्चेला उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक बोलावल्याने पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी मोठं विधान केलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सात खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे. आमचे काही खासदार शिंदे गटाच्या संर्पकात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर आता उद्याच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सात खासदार हे शिंदेच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. सध्या पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरच्या चर्चेनं चांगलाच जोर धरला आहे.

Follow Us